नांदेड जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांकडे दीड हजार कोटींचे कर्ज

नवनाथ येवले
सोमवार, 26 जून 2017

शेतकरी आत्महत्येला आळा बसणार: शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील दीड लाख रूपये पर्यंतचा बोजा कर्जमाफीने उतरवण्यासाठी कर्जमाफीची घोषणा केली आहे. सातबारा कोरा होवून नव्याने कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. क्षेत्रानुसार शेतकऱ्यांना पुन्हा पिककर्ज मिळणार असल्याने शेतकरी आत्महत्येला जिल्ह्यात आळा बसेल यात शंका नाही.

४७ हजार २७७ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ; २२० कोटींच्या कर्जातून सातबारा होणार कोरा

नांदेड: मशागतीसाठी पिक कर्ज काढून शेती उत्पादनावर कर्ज फेडण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील दोन लाख ५८ हजार ३८३ शेतकऱ्यांनी बॅंकाकडून एक हजार ५४९ कोटी ९१ लाख रूपये कर्ज घेतले. शनिवारी शासनाने दीड लाखपर्यंतचे थकित खातेदार-शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफीची घोषणा केल्याने २०१६ पर्यंतच्या ४७ हजार २७७ शेतकऱ्यांचा २२० कोटींचा कर्जाचा बोजा उतरणार असून सातबारा कोरा होणार आहे.

शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा तीन वर्षांपासून गाजत आहे. विरोधी पक्षांनी संघर्ष यात्रेसह विधीमंडळाच्या बैठकीतून कर्जमाफीकडे सरकारचे लक्ष वेधले. अलिकडच्या काळात शेतकरी संघटनांनी कर्जमाफासाठी आक्रमक पावित्रा घेवून मोर्चे आंदोलने केली. कर्जमुक्तीने सरसकट शेतकऱ्यांचा सातबारा कोरा, उत्पादन खर्चाच्या तुलनेत ५० टक्के अधिक शेती मालाला हमीभाव, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात या मागणीसाठी नगर जिल्ह्यातील पुणतांबे गावातून किसान क्रांतीच्या शेतकरी संपाची ठिणगी पेटली आणि एक जुनपासून राज्यभर शेतकरी संप पुकारण्यात आला. कर्जमाफीसह ईतर मागण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर उतरल्याने फडणवीस सरकारने २०१६ पर्यंतच्या थकित खातेदार-शेतकऱ्यांचे दीड लाखापर्यंत कर्जमाफीची घोषणा केली. त्यानुसार जिल्ह्यातील दाेन लाख ५८ हजार ३८३ शेतकऱ्यांनी खरिप, रब्बी हंगामासाठी एक हजार ५४९ कोटी ९१ लाख रूपये कर्ज घेतले. याशिवाय वाहन खरेदीसह इतर कारणासाठी एक लाख ४६ हजार ५९७ शेतकऱ्यांनी एक हजार १३२ कोटी २१ लाख रूपये व्यापारी बॅंकांकडून कर्ज घेतले. सकरकारी बॅंकामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बॅंक व जिल्हा बॅंकेकडून ६८ हजार ७५९ शेतकऱ्यांनी १५१ कोटी ३९ लाख रूपयांसह इतर बॅंकाचे ४३ हजार २८ शेतकऱ्यांनी २५८ कोटी ३१ रूपयांचे कर्ज घेतले. जिल्ह्यात कर्जबारीपणामुळे महिण्याकाठी सरासरी पाच शेतकरी आत्महत्या होत होत्या. दीड लाखावर कर्ज असलेल्या थकित खातेदार-शेतकऱ्यांना रक्कम भरून सातबारा कोरा करता येणार असून नियमीत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना पंचवीस हजार रूपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. २०१६ पर्यंतच्या दीड लाखापर्यंच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असून २०१६-१७ च्या वाटपानुसार विमा रकमेतून पीककर्जाचा हप्ता कपात करण्यात आल्याने शासनाच्या कर्जमाफीवर याचा परिणाम होणार नसल्याने कर्जमाफी लाभधारक शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Web Title: nanded news bank loan and farmer