अपेक्षांच्या ओझ्याखाली गुदमरतेय बालपण

प्रमोद चौधरी
शुक्रवार, 9 जून 2017

आजचे पालक स्वत:च्या मुलाची बुद्धिमत्ता जाणून न घेता दुसऱ्याच्या मुलाशी नेहमी आपल्या मुलाची तुलना करतात. यात महिला अग्रेसर असून, त्या सतत लहान सहान गोष्टींत मुलांना दुसऱ्याच्या मुलाचे उदाहरण देऊन टोमणे मारतात. हा प्रकार सर्वांत धोकादायक असून, यामुळे मुलगा स्वत:चा आत्मविश्‍वास गमावून बसतो.

नांदेड - वाढत्या स्पर्धेच्या युगात जो तो अव्वल येण्यासाठी धावतोय. मुलगा जन्माला येण्यापूर्वीच तो काय होणार, हे ठरवून पालक त्या दिशेने वाटचाल करतात. मुलाला स्वत:ला काय व्हायचे आहे, याचा कधी विचारही ते करीत नाहीत. बालपणापासून महागड्या शाळा, शिकवणी लावून आपल्या अपेक्षांच्या ओझ्याखाली मुलांचे बालपण चिरडण्याचे काम पालकांकडून सर्रास होत आहे.

मुलांकडून पालकांच्या वाढत्या अपेक्षांवर चित्रपटातून नेहमी प्रकाश टाकला जातो. तरी पालक यातून काही बोध घेताना दिसत नाही. ‘थ्री इडियट्‌स’, ‘तारें जमीं पर’ या चित्रपटांतून अपेक्षा बाळगणाऱ्या पालकांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालण्यात आले आहे. तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते. आजचे पालक स्वत:च्या मुलाची बुद्धिमत्ता जाणून न घेता दुसऱ्याच्या मुलाशी नेहमी आपल्या मुलाची तुलना करतात. यात महिला अग्रेसर असून, त्या सतत लहान सहान गोष्टींत मुलांना दुसऱ्याच्या मुलाचे उदाहरण देऊन टोमणे मारतात. हा प्रकार सर्वांत धोकादायक असून, यामुळे मुलगा स्वत:चा आत्मविश्‍वास गमावून बसतो.

पहिल्या-दुसऱ्या वर्गातील विद्यार्थी वर्गातून बाहेर पडताना त्यांच्यात अभ्यासातून येणाऱ्या तणावाच्या गोष्टी सुरू असतात. या विषयात एवढे मार्क घेतले की बाबा अमूक वस्तू घेऊन देतील, या विषयात चांगले गुण मिळाले नाहीत, तर मला आई रागावेल, आज शाळेचा आणि क्‍लासचा होमवर्क खूप जास्त असून, टेन्शन आले आहे, अशी चर्चा विद्यार्थ्यांमध्ये सातत्याने होत असते. यातूनच आजचा विद्यार्थी किती तणावात आहे हे लक्षात येते.

वाढत्या अपेक्षा रोगट मानसिकता
आजचे पालक मुलांच्या बाबतीत अतिशय जागरूक आहेत. मुलांची प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी ते तत्पर असतात. परंतु, असे केल्याने मुलांमधील आत्मविश्‍वास कमी होतो. पालकांच्या वाढत्या अपेक्षांचे ओझे म्हणजे आज रोगट मानसिकता बनली आहे. पालकांनी मुलांकडून अपेक्षा नक्‍की ठेवाव्यात; परंतु, मुलांची क्षमता लक्षात घेऊनच. स्पर्धा करायची झाली, तर त्यांनी स्वत:शी करावी. वाढत्या स्पर्धेत मुलांना सहभागी करण्याऐवजी त्यांच्यातील वेगळेपण शोधून ते विकसित करण्यावर भर दिला, तर तो नक्‍कीच आयुष्यात यशस्वी होईल.

Web Title: nanded news: children pressurized by parents