नांदेड: पीकविमा न मिळाल्याने शेतकऱ्यांनी ठोकले बँकेला कुलूप

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

जुन्या हैदराबाद बॅंकेच्या नवी इंडिया बॅंकेत रमतापूर, होट्टल, काठेवाडी, कुशावाडी, बल्लूर, नरंगल, रामपूर, लोणी, मरखेल, शिवणी, भक्तापूर, बळेगाव, गवंडगाव, चैनपूर, नागराळ, मुजळगा आदींसह वीस गावांतील जवळपास ३०० शेतकऱ्यांनी २०१६ सालातील सोयाबीन, मूग, उडीद, कापूस या पिकांचा विमा बॅंकेत पैसे भरून पाेच पावती घेतली होती.

देगलूर : खरीप हंगाम २०१६ मधील खरीप पीकविमा भरलेल्या जवळपास ३०० शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पीकविम्याची मंजूर रक्कम आणि अनुदान न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शिवसेना देगलूर तालुकाप्रमुख महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली देगलूर येथील मोंढा मैदानातील इंडिया बॅंकेला (हैदराबाद) तब्बल चार तास व्यवहार बंद करून बॅंकेला कुलूप लावून तीव्र निदर्शने केली. हा प्रकार शनिवारी (ता. ११) घडला.

जुन्या हैदराबाद बॅंकेच्या नवी इंडिया बॅंकेत रमतापूर, होट्टल, काठेवाडी, कुशावाडी, बल्लूर, नरंगल, रामपूर, लोणी, मरखेल, शिवणी, भक्तापूर, बळेगाव, गवंडगाव, चैनपूर, नागराळ, मुजळगा आदींसह वीस गावांतील जवळपास ३०० शेतकऱ्यांनी २०१६ सालातील सोयाबीन, मूग, उडीद, कापूस या पिकांचा विमा बॅंकेत पैसे भरून पाेच पावती घेतली होती. बॅंकेच्या हलगर्जीपणामुळे व ढिसाळ निष्क्रिय कारभारामुळे ३०० शेतकऱ्यांच्या पीकविम्याची रक्कम बॅंकेने विमा कंपनीकडे मुदतीच्या आत जमा न केल्याने हे शेतकरी पीकविमा अनुदानापासून वंचित असून बॅंकेला वारंवार निवेदन देऊन घेराव देखील (ता. २४ जुलै) शाखाधिकारी प्रसाद यांना घातला होता. तेव्हा शेतकऱ्यांचा संताप पाहून ता. ११ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना पीकविमा वाटप करून असे लेखी आश्वासन शाखाधिकारी प्रसाद यांनी दिले होते. त्यामुळे शेतकरी पीकविमा उचलण्यासाठी बॅंकेत आले असता शाखाधिकारी रजेवर असल्याचे समजल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी शिवसेना तालुकाप्रमुख महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करीत घोषणाबाजी करून बॅंकेचा व्यवहार बंद पाडून बॅंकेला कुलूप लावून संताप व्यक्त केला.

नायब तहसीलदार जोशी यांनी पीकविम्याचे अनुदान वाटप करण्याचे आश्‍वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. या वेळी युवा सेनेचे संतोष पाटील, शहाजी हिंगोले, नारायण बिरादार, हनमंत चंद्रे, जगदीश इंगळे, शहाजी बिरादार, विठ्ठल पांढरे, संग्राम डुकरे, श्रीराम बिरादार, आनंदराव पांचारे, दत्ता पांढरे, उमेश देशमुख, तुकाराम निवळे, गोविंद पांचारे, किशन हिंगोले, हनमंत हिंगोले, जणजित काठेवडे, सूर्यभान पाटील, उद्धव पाटील नागराळकर, किशन बिरादार, वसंत सोरटे, गाेरखनाथ धुळेकर, पंडितराव टेकाळे, मारुती यलपलवार उपस्थित होते.

Web Title: Nanded news farmer agitation against bank