साहेब, आम्ही दारिद्र्यातच जीवन जगावे का?

प्रमोद चौधरी
शुक्रवार, 14 जुलै 2017

कर्जमुक्तीचा गवगवा अन् संकटांचे चक्रव्यूह

कर्जमुक्तीचा गवगवा अन् संकटांचे चक्रव्यूह

नांदेडः कृषिप्रधान देशाच्या पोशिंद्यावर यंदाही नैसर्गिक संकट गडद होत आहे. रोहिणी नक्षत्रात दमदार पावसाला सुरवात झाल्यानंतर मृग नक्षत्रातही पेरणी योग्य पाऊस झाला. मात्र, काळ्या आईचे संगोपन करणारा निसर्गच आता बेताल वागत आहे. कापूस, तूर व सोयाबीन पावसाअभावी करपत असल्याने बळीराजावर नवे संकट उभे राहत आहे. सततच्या नैसर्गिक संकटाने व त्याहीपेक्षा शेतमालाचे अस्थिर भाव व चुकीच्या शासकीय धोरणाने शेतातील झालेल्या नुकसानीने राज्यातील शेतकरी पुरता संकटात सापडला आहे. नव्हेतर संभ्रम निर्माण करणारा कर्जमुक्तीचा गवगवा व असमानी संकटाचे चक्रव्यूह शेतकऱ्यांच्या मागावर उभा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता नेहमीकरिता दारिद्र्याचेच जीवन जगावे का? हा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून व्यक्त केला जात आहे.

निसर्ग कोपतो तेव्हा लहान-मोठा असा फरक करीत नाही. चुकीच्या धोरणाने सर्वच शेतकऱ्यांचे नुकसान आजवर झालेले आहे. शेती उत्पादन वाढविणे ही देशाची पहिली गरज आहे. त्यासाठी शेती नफ्याची होईल, अशी धोरणे आखने गरजेचे आहे. कर्जमुक्तीसाठी छेटे-मोठे-मध्यम असे गट न करता सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, अशी माफक अपेक्षा शेतकऱ्यांकडून केली जात आहे. सद्यस्थितीत कर्जमुक्तीची मुक्ताफळे शेतकऱ्यांना संभ्रमावस्थेत टाकत आहे.

जहूबाजूंनी शेतकरी माझे कर्ज माफ होईल का? असे उपरोधिक प्रश्न विचारीत आहे. दुसरीकडे पावसाने डोळे वटारले आहे. शेतकरी गेल्या चार वर्षांपासून सातत्याने नापिकीशी सामना करीत आहे. उत्पादनात कमालीची घट शेतकऱ्यांच्या चिंतनाचा विषय ठरत आहे. यावर्षी निसर्ग चांगला साथ देईल ही भाबडी आशा घेऊन तो कामाला लागला. हवामान खात्याच्या सकारात्मक अंदाजाने पेरणी आटोपली. मृग नक्षत्रात जिल्ह्यात काही प्रमाणात पावसाची हजेरी पिकांना व शेतकऱ्यांना ऊर्जा निर्माण करणारी ठरली.

मात्र, अर्धा मृगनक्षत्र आटोपला अन् पाऊस दीर्घ रजेवर गेला. त्यामुळे शेतातील उभे पीक आता करपू लागले आहेत. त्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करीत असलेला शेतकरी पुरता बेभान झाला आहे. पावसाअभावी भूजल पातळी कमालीची खालावली आहे. तर मायबाप सरकारचा कर्जमुक्तीचा गवगवा संभ्रम निर्माण करणारा ठरत असल्याने शेतकऱ्यांची संकटाची कसोटी सुरुच आहे.

ई सकाळवरील आणखी बातम्या : 
काश्‍मीरप्रश्‍नी मध्यस्थी नको- चीनला भारताचा इशारा
अडीच वर्षांच्या अवीर जाधवचा नवा विक्रम
बाणेर-हिंजवडी रस्त्यास शेतकऱ्यांचा विरोध
पंतप्रधानांनी हिटलरचा मार्ग पत्करावा - संजय राऊत
कर्नाटकमध्ये पेट्रोल सव्वाआठ रुपये स्वस्त

Web Title: nanded news farmer Natural crisis