नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांत बारावीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी

प्रमोद चौधरी
मंगळवार, 30 मे 2017

शैक्षणिक क्षेत्रातील बदलाचे वारे तसेच विविध क्षेत्रांतील स्पर्धा लक्षात घेता बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळते. त्यामुळे बारावीचे वर्ष सुरु झाल्यापासून ते परीक्षेचा निकाल लागेपर्यंत विद्यार्थ्यांसह घरातील सर्वच जण तणावात असतात. परीक्षा संपताच पुढे अभियांत्रिकीला जावे की आरोग्य विज्ञान शाखेकडे जावे किंवा इतर अन्य कोणते क्षेत्र चांगले राहील याची चाचपणी करण्यातच विद्यार्थी व पालक गुंतुन असतात

नांदेड - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये घेतलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल आज (मंगळवार) दुपारी एक वाजता जाहीर झाला. यंदा जिल्ह्यातून ३३ हजार ५५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी २९ हजार ७०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तीन हजार ८४५ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये जिल्ह्यात मुलींनीच बाजी मारली असून जिल्ह्याचा एकूण निकाल ८८.५४ टक्के इतका आहे. विज्ञान शाखेचा सर्वाधिक ९५.५१ टक्के इतका निकाल लागला आहे.

शैक्षणिक क्षेत्रातील बदलाचे वारे तसेच विविध क्षेत्रांतील स्पर्धा लक्षात घेता बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळते. त्यामुळे बारावीचे वर्ष सुरु झाल्यापासून ते परीक्षेचा निकाल लागेपर्यंत विद्यार्थ्यांसह घरातील सर्वच जण तणावात असतात. परीक्षा संपताच पुढे अभियांत्रिकीला जावे की आरोग्य विज्ञान शाखेकडे जावे किंवा इतर अन्य कोणते क्षेत्र चांगले राहील याची चाचपणी करण्यातच विद्यार्थी व पालक गुंतुन असतात. गतवर्षी २५ मे रोजी बारावी परीक्षेचा निकाल लागला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचेही लक्ष निकालाकडे लागून होते.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २८ फेब्रुवारी ते २५ मार्च या कालावधीत बारावीची लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी जिल्ह्यामध्ये ७२ केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून ३३ हजार ६६० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात ३३ हजार ५५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २९ हजार ७०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच एक हजार ८४५ पुनर्परीक्षार्थींपैकी ७८१ विद्यार्थी मंगळवारी जाहीर झालेल्या निकालात उत्तीर्ण झाले आहेत. मुलांचा ८५.८४ तर मुलींचा ९२.३० टक्के इतका जिल्ह्याचा निकाल आहे.

हिंगोली जिल्ह्याला निकाल 89.50 टक्के
दरम्यान, या परिक्षेसाठी एकूण 12 हजार 530 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 12 हजार 504 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. त्यापैकी 11 हजार 192 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्याचा निकाल 89.50 टक्के लागला आहे.

जिल्ह्यात यावर्षीही बारावी परिक्षेमधे मुलींनीच बाजी मारली असून या परिक्षेत सात हजार 599 विद्यार्थ्यांपैकी सहा हजार 640 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 87.38 टक्के आहे. तर चार हजार 892 विद्यार्थीनींपैकी चार हजार 554 विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत. विद्यार्थीनींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 93.09 टक्के एवढे आहे. 

परभणी जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक ९०.५९ टक्के
औरंगाबाद विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाअंतर्गत परभणी जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी सर्वाधिक आहे. जिल्ह्यात सर्व शाखांच्या नियमित २२ हजार ११० विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. तर २२ हजार ५९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यामध्ये मुलांची संख्या १३ हजार ६२६ तर मुलींची संख्या आठ हजार ४३३ होती. त्यापैकी १९ हजार ९८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी ९०.५९ टक्के भरते. उत्तीर्णतेच्या टक्केवारीत पुन्हा एकदा मुलींनीच अव्वल स्थान पटकावले. १३ हजार ६२६ मुलांपैकी १२ हजार १४८ मुले उत्तीर्ण झाली ही टक्केवारी ८९.१५ टक्के आहे. तर आठ हजार ४३३ मुलींपैकी सात हजार ८३६ मुली उत्तीर्ण झाल्या ही टक्केवारी ९२.९२ टक्के भरते.

Web Title: Nanded News: Gorls top HSC examination