कृषिदिन एक जुलैलाच साजरा होणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 जून 2017

तांडेसामू चालो अभियान : शासनाचे एक पाऊल मागे
 

नांदेड : कृषिक्रांतीचे अग्रदूत व पंचायतराजचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती एक जुलैला कृषिदिन म्हणून साजरी केली जात होती. मात्र यावर्षी शासनाने त्यात बदल करीत एक जुलै हा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. यावर तांडेसामू चालो अभियानाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेत शासनाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर शासनाने एक जुलैला कृषिदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.

सामान्य प्रशासन विभागाने २० मे २०१७ रोजी जीआर काढून एक जुलैला कृषिदिनाऐवजी राज्य मतदार दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. वसंत विचारधारेचे मुख्य प्रसारक तथा तांडेसामू चालो अभियानाचे प्रवर्तक एकनाथ पवार यांनी ही बाब लोकप्रतिनिधी व समाजबांधवाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले. विविध मान्यवर, वरिष्ठ अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून २० मेच्या शासननिर्णयाचा निषेध नोंदविला. २१ मे रोजी विधानसभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर विधान परिषदेत विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे, हरिभाऊ राठोड, शरद रणपिसे, आमदार भाई जगताप, जयंत पाटील यांनी यावर तीव्र आक्षेप नोंदविला. वसंतराव नाईकांची जयंती कृषिदिन आहे. एक जुलैला कृषिदिन म्हणूनच साजरा व्हावा, अशी भूमिका घेतली. नागपूर येथे धरणे आंदोलन करण्यात आले. या सर्व गोष्टींचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर शासनाने दोन मे रोजी तातडीने शुद्धिपत्रक काढून एक जुलैला कृषिदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.

कार्यालयापुरते मर्यादित राहू नये
कृषिदिन केवळ शासकीय कार्यालयात साजरा होण्यापर्यंत मर्यादित न राहता, तो शेतकऱ्यांच्या बांधावर साजरा व्हावा, अशी भूमिका मोहन चव्हाण, एकनाथ पवार, नामा जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी घेतली. त्यासाठी ते रस्त्यावरदेखील उतरले. औरंगाबादमध्ये कृष्णा राठोड, राजपालसिंग राठोड यांच्यासह बहुजन समाज व भीमसैनिक, गोरसेनेसह, बंजारा समाजातील अनेक संघटना जिल्हा व तालुकास्तरावर पुढे आल्या. मुंबई, पुणे, पुसद, माहूर येथे निवेदन देण्यात आले. या सर्व गोष्टींची दखल घेत सरकारने २० मे रोजी काढलेला जीआर रद्द केला.

शेतकऱ्यांच्या बांधावर कृषिदिन साजरा करणार
वसंतराव नाईक यांची जयंती एक जुलैला कृषिदिन म्हणून साजरा होणार आहे. वसंतराव नाईक यांना आदरांजली व शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी कृषिदिन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर साजरा करण्याचा निर्धार विविध संघटनांनी व तांडेसामू चालो अभियानाने केला आहे.

Web Title: nanded news krushi din agriculture 1 July tandesamu