मुलीची धिंड काढल्याने आईची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

वामन गाेखले पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेऊन तिला मारहाण करत असे. रविवारी (ता. चार) सायंकाळी जावई वामन गोखले यांनी घरी येऊन वाद घालून रमाबाई भगत यांना मारहाण केली. यात त्या गंभीर जखमी झाल्या; तरीही त्यांनी जावयाविरुद्ध तक्रार दिली नाही

नांदेड - मुलीच्या चारित्र्यावर संशय घेऊन नेहमीच मारहाण करणाऱ्या जावयाने व गल्लीतील काही नागरिकांनी मुलीची धिंड काढली. एवढेच नाही तर रस्त्याने तिला मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार घडला. ही घटना सहन झाली नसल्याने मुलीच्या वृद्ध आईने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (ता. सहा) घडली. या प्रकरणात सात जणांवर गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. यापैकी दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.

पाेलिसांनी सांगितले, की शहराच्या सांगवी परिसरात रमा संभाजी भगत (वय ६०) आपल्या विवाहित मुलींसोबत राहातात. त्यांची मुलगी ज्योती गोखले आणि त्यांचे पती वामन सदाशिव गोखले यांच्यात काही दिवसांपासून कौटुंबिक वाद होते. वामन गाेखले पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेऊन तिला मारहाण करत असे. रविवारी (ता. चार) सायंकाळी जावई वामन गोखले यांनी घरी येऊन वाद घालून रमाबाई भगत यांना मारहाण केली. यात त्या गंभीर जखमी झाल्या; तरीही त्यांनी जावयाविरुद्ध तक्रार दिली नाही. या दोघांचा वाद पोलिस अधीक्षक कार्यालयात पोचला होता.

मंगळवारी (ता. सहा) सकाळी वामन गोखले पुन्हा सासरवाडीला गेले. त्यांनी आपल्या पत्नीला मारहाण केली. एवढेच नाही तर तिची धिंड काढली. गल्लीतील काही लोकांनी त्यांना मदत केली. विमानतळापर्यंत मारहाण करत आणले. या वेळी ज्योती यांच्या नातेवाइकांनी त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार करून सायंकाळी ते दोघे जण विमानतळ पोलिस ठाण्यात पोचताच वरील घटना सहन न झाल्याने रमाबाई भगत यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजले. यावरून जावई वामन गोखले व त्यांच्या इतर सात मित्रांविरुद्ध राजरतन भास्कर दीपके यांनी तक्रार दिली. यावरून मरणास कारणीभूत ठरणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल करून पोलिस निरीक्षक सुभाष राठोड यांनी तिघांना रात्री दोन वाजता अटक केली. यातील एक बालक आहे.

जावई व त्याच्या एका मित्राला तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सुनील माने करीत आहेत.

Web Title: Nanded News: Mother commits suicide

टॅग्स