नांदेड-उस्मानाबाद-लातूरच्या शाळांमधील पाणीपुरवठा योजना आणणार सौर ऊर्जेवर

chandrashekhar bawankule
chandrashekhar bawankule

उर्जामंत्री बावनकुळे ः जिल्ह्यातील १६ उपकेंद्रांचे भूमिपूजन

नांदेडः नांदेडसह उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि नळ पाणीपुरवठा योजनांना साेलारवर (साैर उर्जा) आणून वीज बिलापासून मुक्ती देण्यात येणार असल्याची घोषणा करतानाच उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना आपल्याकडील थकबाकीची मूळ रक्कम भरावी, तो पैसा त्यांच्या भागाच्या वीज विकासासाठीच वापरला जाईल असे आश्वासन दिले.

श्री. बावनकुळे यांच्या हस्ते आज (शुक्रवार) जिल्ह्यातील विविध १५ ठिकाणच्या उपकेंद्रांच्या कामाचे कुसूम सभागृहात कळ दाबून एकाच वेळी भूमिपूजन केले. या वेळी ते बोलत होते. आमदार हेमंत पाटील, प्रताप पाटील चिखलीकर, सुभाष साबणे, डॉ. तुषार राठोड, माजी खासदार सुभाष वानखेडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, महानगराध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे, डॉ. शोभा वाघमारे, महावितरणचे लखोटीया, मुख्य अभियंता अविनाश पाटोळे, अधीक्षक अभियंता आर. आर. कांबळे, कार्यकारी अभियंता सौदागर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता ए. जी. गाडेकर यांची उपस्थिती होती.

श्री. बावनकुळे म्हणाले, की उर्जा खाते हे अती संवेदनशील आहे. या ठिकाणी अत्यंत जोखमीने काम करावे लागते. कर्मचारी व अधिकाऱ्यांनी ग्राहकसेवा देताना कसूर करु नये. आपण जनतेचे सेवादार आहोत, याची जाणीव ठेवावी. युती सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडीत केला नाही; तसेच वीज, पाणी व रस्ते या तीन बाबी मराठवाड्यात कमी पहावयास मिळतात. येणाऱ्या काळात ही पोकळी नक्कीच भरुन काढली जाईल. राज्यातील जिल्हा परिषद शाळा लवकरच सौर उर्जेवर केल्या जाणार आहेत. नांदेड जिल्ह्यात ३०७ कोटींच्या कामांना सुरवात झाली आहे. येणाऱ्या काळात मोठा निधी या भागासाठी वापरू व विजेची हानी भरून काढून शेतकरी, वीज ग्राहकांना चांगली सेवा देवू. राज्यातील शेतकऱ्यांकडे २२ हजार कोटी थकबाकी असून त्यापैकी नांदेड जिल्ह्याची थकबाकी आठशे कोटी अाहे. वसूली लवकर दिली तर हा पैसा येथेच वापरला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. महावितरण व महापारेषणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामे नीट करण्याचा सल्ला दिला. शाखा अभियंता स्तरावर ग्रामीण भागात दरमहा जनता दरबार घेऊन जनतेच्या विजेबद्दलच्या तक्रारी सोडव्यात. विजेचे अपघात होतात त्याला नव्वद टक्के महावितचरणच जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. एखादा अपघात झाला किंवा त्यातून मनुष्यहाणी झाली तर संबंधित अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक श्री. कांबळे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com