नांदेड : एक वर्षापूर्वी मुलगी अन् आता आईचा त्याच रिक्षाच्या धडकेत मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

नातेवाइकांनी चालकाच्या अटकेसाठी मृतदेह ठेवले पोलिस ठाण्यात

नातेवाइकांनी चालकाच्या अटकेसाठी मृतदेह ठेवले पोलिस ठाण्यात

इस्लापूर (नांदेड) : भरधाव वेगाने धावणाऱ्या रिक्षाने धडक दिल्याने एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बधुवारी (ता. २३) सोनपेठ (कुपटी) (ता. किनवट) येथे घडली. एक वर्षापूर्वी याच रिक्षाचालकाच्या रिक्षाच्या अपघातात या वृद्ध महिलेच्या मुलीचा मृत्यू झाला होता. त्या रिक्षाचालकास अटक केल्याशिवाय अंत्यविधी करणार नसल्याची भूमिका ठाण्यात जमलेल्या नातेवाइकांनी घेतली. यानंतर थोडा वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने वृद्ध महिलेचे प्रेतमृतदेह दोन तास इस्लापूर ठाण्यातच होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध घेत अटक केल्याने जमाव शांत झाला.

इस्लापूर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सोनपेठ (कुपटी) (ता. किनवट) येथील रहिवासी गंगाबाई सोनबा भुरके (वय ९०) ही वृद्ध महिला तिच्या घरासमोर थांबली होती. या वेळी (एम.एच.२६ जी २०१५) क्रमांकाच्या रिक्षाने भरधाव वेगाने येत गंगाबाई भुरके या वृद्ध महिलेस जोराची धडक दिली. रिक्षाच्या धडकेत महिला गंभीर जखमी झाल्याने तिला तातडीने नांदेड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार चालू असताना महिलेचा शुक्रवारी (ता. २५) रुग्णालयातच मृत्यू झाला.

नांदेडहून आणलेले महिलेचे मृतदेह नातेवाइकांनी इस्लापूर पोलिस ठाण्यात ठेवून या महिलेच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या रिक्षाचालकास अटक केल्याशिवाय अंत्यविधी करणार नसल्याची भूमिका नातेवाइकांनी घेतली. एक वर्षापूवी याच रिक्षाचालकाने याच रिक्षाच्या अपघातात वृद्ध महिलेच्या मुलीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मृताच्या नातेवाइकांनी रिक्षाचालकास त्वरित अटक करण्याचा आग्रह धरला. सहायक पोलिस निरीक्षक रामेश्‍वर कायदे यांनी नातेवाइकांच्या भावना लक्षात घेत तातडीने रिक्षाचालकाचा शोध घेऊन ताब्यात घेतले. शिवाजी सटवाजी भुरके यांच्या तक्रारीवरून आरोपी रिक्षाचालक सटवा माधव खुडे यांच्याविरुद्ध वाहन चालवताना निष्काळजीपणा करून मृत्यूस जबाबदार असल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून रिक्षाचालक सटवा खुडे यास अटक केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विठू बोने करीत आहेत.

Web Title: nanded news rikshaw accident women dead