नांदेड: लग्नपत्रिकेतूनही "लेक वाचवा'चा जागर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

आता मुलींची संख्या घटल्यामुळे समाजातील उपवर मुलांच्या लग्नाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कधी काळी मुलीला दुय्यम ठेवणाऱ्या समाजामध्ये आता "लेक वाचवा'चा जागर होत आहे

नांदेड - लग्नाची पत्रिका म्हटलं की, देव देवता आणि महापुरुषांची प्रतिमा, त्यातून लावला जाणारा जातीपातीचा झेंडा, हे आतापर्यंतचे चित्र. मात्र आता देव, देवता आणि महापुरुषांच्या प्रतिमेबरोबरच "मुलींच्या घटत्या जन्मदरा'कडे लक्ष वेधून अनेक लग्नपत्रिकेत "लेक वाचवा, लेक शिकवा'चा जागर केला जात आहे. यातून फुल नाही फुलाची पाकळी याप्रमाणे मुलींचा जन्मदर वाढविण्याबाबत जनजागृती केली जात आहे.

संसाररुपी जीवनाच्या वेलीवर फुललेली "कळी' हा जीवनातील सर्वांत आनंदाचा क्षण. मग जन्मास येणारे बाळ हे मुलगा असो की, मुलगी. मात्र, गेल्या पंधरा ते वीस वर्षांत मुला-मुलींमध्ये परिस्थितीने दरी निर्माण केली. यातून जन्मदात्या मातापित्यांमध्येच मुलींबद्दल भेदभाव निर्माण झाला. यातून मुलींच्या रुपाने उमलत असलेली कळी, फुलण्याआधी खुडण्याचे काम सुरु केले. मुलगी ही दुसऱ्याचे धन असे म्हणून तिला घराबाहेर, समाजात दुय्यम वागणूक मिळत गेली.

परिणामी मुलींची संख्याही मोठ्या प्रमाणात घटली. काळजाचा गोळा आणि दिवसभर राबराब राबुन तहानलेला बाप घरी येताच, हाती पाण्याचा लोटा भरून देणारी ही मुलगी फक्त लग्नाच्या खर्चापोटी नकोशी झाली.

आता मुलींची संख्या घटल्यामुळे समाजातील उपवर मुलांच्या लग्नाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कधी काळी मुलीला दुय्यम ठेवणाऱ्या समाजामध्ये आता "लेक वाचवा'चा जागर होत आहे. येथील संजय कव्हर यांची कन्या ज्ञानेश्‍वरीच्या लग्नाच्या पत्रिकेवर "लेक वाचवा, लेक शिकवा'चा संदेश दिला आहे. या संदेशामुळे या पत्रिकेची चर्चा होत असली तरी सामाजिक मानसिकतेत होत असलेला हा बदल निदान मुलींसाठी तरी सुखावह आहे, हे मात्र नक्की.

लग्नपत्रिकेवरील संदेश...
लेक वाचवा, लेक शिकवा
कोण पाहिजे?
जन्म द्यायला आई पाहिजे,
राखी बांधायला बहिण पाहिजे,
गोष्टी सांगायला आजी पाहिजे,
हट्ट पुरवायला मावशी पाहिजे,
पुरणपोळी भरवायला मामी पाहिजे,
जीवनाच्या सोबतीला मैत्रीण पाहिजे,
आयुष्याच्या साथिला पत्नी पाहिजे,
पण हे सर्व करायला आधी
एक मुलगी वाचली पाहिजे....

Web Title: Nanded News: Save Girl Child Initiative