नांदेडमध्ये वाहतूक शाखेची अडीच महिण्यात दमदार कारवाई

प्रल्हाद कांबळे
शुक्रवार, 14 जुलै 2017


  • साडेचार हजार वाहनावर कारवाई, सत्तावीस लाखाचा दंड वसुल
  • पोलिस अधिक्षक चंद्र किशोर मीनांचा दणका

नांदेड: शहरातील बेशिस्त वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस अधिक्षक चंद्र किशोर मीना यांनी सर्वात पहिले वाहनधारकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. यासाठी वाहतूक शाखेला सक्त सुचना दिल्या. विनापरवाना शहरातील ॲटोंची संख्या ही लक्षणीय असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने ॲटोवर कारवाईचा बडगा उगारला. शहर वाहतूक शाखेने अडीच महिण्यात ४ हजार ६५१ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. यातून शासनाला तब्बल २७ लाख २९ हजार ५०० रूपयाचा पहिल्यांदा एवढा महसुल मिळाला. सध्या शहरातील वाहतूक काही अंशी सुरळीत झाल्याचे चित्र पहावयास मिळते.

नांदेड शहराचा वाढता विस्तार व लोकसंख्या लक्षात घेता शहरातील रस्ते रुंद हवे होते. परंतु गुरूता- गद्दी कार्यक्रमांतर्गत रस्त्याची रूंदी करण्यात आली. परंतु त्यात फुटपाथ, सायकल ट्रॅक आणि वाहन पार्कींगची व्यवस्था केली. हा पॅटर्न नेदरलॅंड देशातील रस्त्यासारखा केला. परंतु तेथील लोकसंख्या, वाहनांची संख्या ही कमी आहे. शहरातील अरूंद रस्त्यावर वाहनांची संख्या ही हजारामध्ये आहे. त्यातच विनापरवाना ॲटो, चारचाकी वाहने, ग्रामीण भागातील परवाना असतांना शहरात घुसणे, जडवाहतूक शहरात आणणे, वाहतूकीला अडथळा निर्माण होईल अशी वाहणे उभी करणे यामुळे नेहमीच वाहतूकीचा खेळखंडोबा होत आहे. शहरात जवळपास पाच हजाराहून अधिक अॅटोंची संख्या आहे. ज्यात तीस टक्के विनापरवाना नियमबाह्य चालतात. दक्षिण व उत्तर नांदेडला जोडणार व शहराची मुख्य जीवनवाहिनी ओळखला जातो तो रस्ता म्हणजे तरोडा नाका ते बर्की चौक होय. याच रस्त्यावर मोकाट जनावरे, कुत्री, डुकरांचा संचार असतो. त्यासोबतच फळविक्रेते, छोटे व्यापारी, दुकानदाराकडून फुटपाथवर अतिक्रमण सुरू आहे. यामुळे वाहतूकीचा खेळखंडोबा होतो. पोलिस अधिक्षक श्री. मीना यांनी वाहतुक शाखेला सुचना देऊन दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले. या शाखेवर पोलिस उपअधिक्षक विश्‍वेश्‍वर नांदेडकर यांचे नियंत्रण ठेवून त्यांनी यात सकारात्मक काम सूरु आहे.

मे, जून आणि १३ जुलै २०१७ पर्यंत वाहतूक शाखेने ४ हजार ६५१ वाहनावर दंडात्मक कारवाई करत २७ लाख २९ हजार ५०० रुपयाचा महसुल जमा केला. यात मे महिण्यात २ हजार ३७२ वाहनांवर कारवाई करुन त्यांच्याकडून १२ लाख ६ हजार व जून मध्ये एक हजार ६४८ वाहनावर कारवाई करत १० लाख ५४ हजार ९०० तर १३ जुलै पर्यंत ६३१ वाहनावर कारवाई करत ४ लाख ६८ हजार ९०० रुपयाचा दंड वसुल केला. यात विनापरवाना वाहन चालविणे, नंबर प्लेट नसणे, किंवा डिजीटल, पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणे, एकेरी मार्गात घुसणे, ट्रीपल सीट व फ्रन्ट सिट प्रवाशी बसविणे, सिग्नल न पाळणे, मद्य प्राशन करून वाहन चालविणे या चुकांचा समावेश असतो.

ई सकाळवरील आणखी बातम्या : 
काश्‍मीरप्रश्‍नी मध्यस्थी नको- चीनला भारताचा इशारा
अडीच वर्षांच्या अवीर जाधवचा नवा विक्रम
बाणेर-हिंजवडी रस्त्यास शेतकऱ्यांचा विरोध
पंतप्रधानांनी हिटलरचा मार्ग पत्करावा - संजय राऊत
कर्नाटकमध्ये पेट्रोल सव्वाआठ रुपये स्वस्त

Web Title: nanded news traffic department action