वासुदेव आला हो.. वासुदेव आला; वासुदेव समाजाची फरपट थांबेना

प्रमोद चौधरी
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

हक्काची जागा मिळावी
वासुदेव समाज उपेक्षित जीवन जगत आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतो आहे. आज समाजातील मुले-मुली उच्चशिक्षण घेत आहेत. परंतु, रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने बेरोजगार आहेत. शिवाय महापालिकाही पाच वर्षांपासून पाठपुरावा करूनही समाजाचे धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामूहिक विवाह, वधू-वर परिचय मेळावा आदी कार्यक्रमांसाठी हक्काची जागा उपलब्ध करून देत नाही. आगामी महापालिकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा विषय मांडून भू-दान मिळवून देण्याची मागणी वासुदेव समाज सेवा संघातर्फे करण्यात आली आहे.

नांदेड : भारतीय स्वातंत्र्याला मंगळवारी (ता. १५) सत्तर वर्षे पूर्ण होत आहेत. तरीही वासुदेव समाजाची फरपट काही संपली नाही. दररोज नवनवीन आव्हानांना या समाजातील नागरिकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. राष्ट्रपतीपासून ते थेट स्थानिक लोकप्रतिनिधींकडे गाऱ्हाणे मांडूनही प्रश्न कायमच आहे.

वासुदेव समाज माहाराष्ट्रातील भटकी जमात आहे. हा समाज भज- ‘ब’मध्ये समाविष्ट आहे. या समाजाला आंध्रप्रदेशमध्ये जंगम असे संबोधले जाते. तर काही राज्यात भट म्हणून नोंद आहे. कुठेही असला तरी हा समाज स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही विकासापासून कोसोदूरच आहे. जिल्ह्यात वासुदेव समाजाची लोकसंख्या पाच हजारावर आहे. राज्यात ती ८० हजारांपेक्षा अधिक आहे. तसा हा समाज अल्पसंख्यांक पेक्षाही अल्प आहे.

या समाजातील मुला-मुलींना रोजगार नाही. भज - ‘ब’ प्रवर्गात मोडणाऱ्या वासुदेव समाजासोबत इतर चाळीसपेक्षा जास्त जाती समाविष्ट आहेत. सवलती मात्र २.५ टक्केच आहेत.

पाच वर्षांपासून महापालिका क्षेत्रात नांदेड येथे वासुदेव समाजासाठी स्वतंत्र हक्काची जागा मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. अद्याप त्याला यश आलेले नाही. जिल्हाधिकारी, खासदार, आमदार, महापालिका सभागृह नेता, विरोधीपक्ष नेता, महापौर, नगरसेवक या सर्वांना निवेदने दिलीत. त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. वासुदेव सांप्रदाय महाराष्ट्राची अस्मिता आहे. यांना आद्यशाहीर म्हटल्या जाते. गायनातून लोकांना धर्मनितीच्या गोष्टी सांगून जनजागृती करणारा वासुदेव शासनाच्या दृष्टीआड झालेला आहे. दिलेल्या दानाच्या मोबदल्यात हिंदू धर्मात कुळीचा उद्धार करणारे वासुदेवाशिवाय दुसरी कोणतीही संस्था नाही. त्यामुळेच धार्मिक परंपरेचा वसा लाभलेल्या वासुदेव समाजाला आजही समाजामध्ये वेगळे महत्त्व प्राप्त आहे.

हक्काची जागा मिळावी
वासुदेव समाज उपेक्षित जीवन जगत आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतो आहे. आज समाजातील मुले-मुली उच्चशिक्षण घेत आहेत. परंतु, रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने बेरोजगार आहेत. शिवाय महापालिकाही पाच वर्षांपासून पाठपुरावा करूनही समाजाचे धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामूहिक विवाह, वधू-वर परिचय मेळावा आदी कार्यक्रमांसाठी हक्काची जागा उपलब्ध करून देत नाही. आगामी महापालिकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा विषय मांडून भू-दान मिळवून देण्याची मागणी वासुदेव समाज सेवा संघातर्फे करण्यात आली आहे.

Web Title: Nanded news Vasudeo community problems