गंभीर गुन्ह्यातील अट्टल पाच गुन्हेगार जेरबंद

गंभीर गुन्ह्यातील अट्टल पाच गुन्हेगार जेरबंद

नांदेड : तेलगंना, हिंगोली, अंबेजोगाई आणि नांदेड परिसरात खून, चोरी, दरोडा, दुचाकी चोरी, खूनाचा प्रयत्न करणे यासह गंभीर गुन्‍हे करून पसार असलेल्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद दिघोरे यांच्या पथकांनी केली.

तेलंगना राज्यातील राजगोपालपेठ, सिध्दीपेठ (राज्य तेलंगना) पोलिस ठाण्यांतर्गत गंभीर गुन्हे करून हे गुन्हेगार नांदेडात आसरा घेऊन राहत होते. मिळेल ते काम करणे व थोडे दिवस जाताच पुन्हा एखादा गंभीर गुन्हा करणे हे त्यांचे नित्याचे काम. पोलिस अधिक्षक संजय जाधव आणि अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी जिल्ह्यात सध्या सण- उत्सवाचे वातावरण असल्याने काही अनुचीत घटना घडु नये यासाठी पोलिस यंत्रणेला सतर्क केले. तसेच शहरात व परिसरात फरार व पाहिजे असलेल्या गुन्हेगारांना पकडण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनिल निकाळजे यांना दिली. यावरून त्यांनी आपल्या पथकांना कार्यरत केले. त्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद दिघोरे यांनी फौजदार सदानंद वाघमारे, जसवंतसिंग, राजू पांगरीकर, बालाजी सातपुते, तानाजी यळगे, शेख जावेद, घुंगरुसिंग टाक यांना सोबत घेऊन शहरात गस्ती घातली.

यावेळी त्यांनी बोंढार शिवारातून अट्टल व सराईत गुन्हेगार शफी बिल्डर उर्फ शेख शफीक शेख मोईन, अश्रफ परवेज खान, शिवाजीनगर, लालवाडी आणि बाबा उर्फ सय्यद सरवर रा. शांतीनगर यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी जप्त केल्या. या तिन्ही गुन्हेगारांना सिध्दीपेठ ठाण्याचे फौजदार चंद्रशेखर यांच्या स्वाधीन केले. तसेच हरदयालसिंग ठेलासिंग पाठी रा. दत्तनगर याला बाफना परिसरातून तर किशनसिंग दारासिंग दुधानी याला नगिनाघाट परिसरातून अटक केली. किशनसिंग दुधानी याला अंबेजोगाई पोलिसांच्या स्वाधीन केले. या सर्व आरोपींवर गंभीर गुन्हे हिंगोली, परभणी, नांदेड व तेलंगनात दाखल आहेत. या पथकाचे पोलिस अधिक्षक जाधव यांनी कौतूक केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com