Nanded: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दररोज ५० लाखाचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटी
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दररोज ५० लाखाचे नुकसान

नांदेड : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दररोज ५० लाखाचे नुकसान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केलेला संप अजूनही तोडगा निघाला नसल्यामुळे सुरूच आहे. या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत तर दुसरीकडे नांदेड जिल्ह्यातील नऊ आगाराचे दररोज ५० लाखाचे नुकसान होत आहे. एस टी महामंडळातील संयुक्त कृती समितीतर्फे गेल्या ता. २८ आॅक्टोंबरपासून राज्य शासनात विलीनीकरण करावे, या व इतर मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू आहे.

या संपामुळे मात्र, प्रवाशांचे हाल होत आहेत. नांदेड जिल्ह्यात नऊ आगार असून जवळपास ५५० बस आहेत. एकूण कर्मचारी तीन हजार ३०३ आहेत. संपात सहभाग घेतल्यामुळे आत्तापर्यंत ६५ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. संपापूर्वी दोन हजार दोनशे फेऱ्या होत होत्या. त्या बंद झाल्यामुळे दिवसाला सरासरी ५० लाखाचे नुकसान होत असल्याची माहिती महामंडळातर्फे देण्यात आली. दरम्यान, सर्वसामान्य व ग्रामीण जनतेच्या दळणवळणाचे महत्वपूर्ण साधन असलेली एसटी बस पूर्ववत चालू झाली पाहिजे. शासन यंत्रणेने कर्मचाऱ्यांचा संप तत्काळ मिटवावा, अन्यथा जनतेला रस्त्यावर यावे लागेल, असा इशारा माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी दिला.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने एसटी विभागीय कार्यालयासमोर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या समर्थनार्थ निदर्शने करण्यात आली. यावेळी डॉ. काब्दे म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. त्या तातडीने सोडविण्याची जबाबदारी शासनाची आहे. एसटी संपामुळे ग्रामीण व सर्वसामान्य जनतेची दळणवळणाच्या बाबतीत गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांचेही नुकसान होत असल्याने शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर योग्य तोडगा काढावा, अन्यथा सर्वसामान्य नागरिक व जनता रस्त्यावर उतरेल, असा इशारा दिला.

यावेळी ना. रा. जाधव, विजय गाभणे, ॲड. प्रदीप नागापूरकर, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे बालाजी पवार, पेन्शनर्सचे एम. आर. जाधव, के. के. जांबकर, उज्ज्वला पडलवार, गंगाधर गायकवाड, दुर्गे यांची भाषणे झाली. यावेळी ओ. के. जोशी, प्रा. लक्ष्मण शिंदे, गणेश शिंदे, पुष्पा कोकिळ, शोभा डहाळे, मारोती केंद्रे, पांडुरंग पावडे, दिगंबर घायाळे, मथुरा गायकवाड, जिजाबाई सोनकांबळे आदी सहभागी झाले होते.

loading image
go to top