अंतिम परीक्षेवेळी द्यावा लागणार पदवीसाठीचा अर्ज

जयपाल गायकवाड - सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

नांदेड - विद्यापीठातून पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उत्तीर्ण होऊन तीन-चार वर्षे झाली तरी बहुतांश विद्यार्थी पदवी घेण्यासाठी अर्ज सादर करीत नाहीत. असे विद्यार्थी नोकरी किंवा पुढील प्रवेशासाठी आवश्‍यकता भासल्यास तातडीने पदवी प्रमाणपत्र देण्याची विनंती करतात. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनावर ताण येतो; तसेच विद्यार्थ्यांचीही गैरसोय होते. ती टाळण्यासाठी अंतिम वर्षाच्या परीक्षा अर्जासोबतच पदवीसाठीचा अर्ज भरून घ्यावा, असा निर्णय येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने घेतला आहे.

विद्यापरिषदेच्या बैठकीत पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा अर्जासोबत पदवीसाठीचा अर्ज (Convocation Form) भरून घेण्यात यावा असा निर्णय झाला आहे. याअनुषंगाने विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व शैक्षणिक संकुलाचे संचालक, संचालक उपकेंद्र लातूर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात आले आहे. 2017 मध्ये होणाऱ्या परीक्षेपासून हा निर्णय अमलात येणार आहे.

पदवी प्रमाणपत्र घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 180, तर अनुपस्थित राहून पदवी पोस्टाने हवी असणाऱ्यांसाठी 223 रुपये शुल्क आकारले जाईल. अर्जासोबत प्रथम व द्वितीय वर्षाच्या गुणपत्रिकेची प्रत जोडावी लागेल. पदवी अर्ज परीक्षा अर्जासोबतच दीक्षांत विभागामध्ये सादर करावा लागेल. उपस्थित राहून पदवी स्वीकारणारे, पोस्टाने पदवी स्वीकारणाऱ्यांची स्वतंत्र यादी, शुल्क, सादर केलेले पुरावे आदी बाबी महाविद्यालयांना एकाच वेळी सादर कराव्या लागतील. उपस्थित राहून पदवी स्वीकारणारे विद्यार्थी दीक्षांत समारंभास अनुपस्थित राहिल्यास त्यांचे पदवी प्रमाणपत्र संबंधित महाविद्यालयात पाठविले जाईल. ते संबंधितास देण्याची व्यवस्था महाविद्यालयास करावी लागेल. त्यासाठी महाविद्यालयांना एक स्वतंत्र नोंदवही ठेवावी लागेल.

पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम उत्तीर्ण होऊन चार-पाच वर्षे झाली तरी बहुतांश विद्यार्थी पदवी घेण्यासाठी अर्ज सादर करीत नाहीत. पुढील प्रवेश किंवा नोकरीसाठी आवश्‍यकता भासल्यावर विद्यापीठाकडे तशी मागणी केली जाते. त्यामुळे विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यापीठाचा प्रशासकीय ताण कमी होईल.
डॉ. रवी सरोदे, परीक्षा नियंत्रक

Web Title: nanded university