नांदेडमध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

नांदेड - नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी कॉंग्रेसच्या शांताबाई निवृत्तीराव पवार-जवळगावकर यांची, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे समाधान बालचंद जाधव यांची निवड झाली. श्रीमती जवळगावकर (वय 70) या ज्येष्ठ सदस्या आहेत. सत्तेसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली. राष्ट्रीय समाज पक्ष, अपक्ष अशा प्रत्येकी एकाने आघाडीला पाठिंबा दिला. शिवसेना, भाजपने स्वतंत्ररीत्या निवडणूक लढविली. 

पीठासीन अधिकारी, तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया झाली. सर्व 63 सदस्य उपस्थित होते. तत्पूर्वी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून शांताबाई पवार-जवळगावकर यांनी अध्यक्षपदासाठी, तर समाधान बालचंद जाधव यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले. भाजपकडून अनुक्रमे पूनम राजेश पवार, लक्ष्मण गंगाराम ठक्करवाड, शिवसेनेकडून संगीता सुभाष गायकवाड, बबन रामराव बारसे यांनी अर्ज दाखल केला. 

अध्यक्षपदासाठी शांताबाई जवळगावकर यांना 40, पूनम पवार यांना 13, संगीता गायकवाड यांना 10 मते मिळाली. उपाध्यक्षपदासाठी समाधान जाधव यांना 40, लक्ष्मण ठक्करवाड यांना 13, बबन बारसे यांना दहा मते मिळाली. श्री. काकाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांच्यासह उपस्थितांनी विजेत्यांचे स्वागत केले. 

अध्यक्ष जवळगावकर यांनी मावळत्या अध्यक्षा मंगला गुंडले यांच्याकडून, तर उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी उपाध्यक्ष दिलीप धोंडगे यांच्याकडून पदभार स्वीकारला. आमदार प्रदीप नाईक, आमदार अमर राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे-नागेलीकर, माजी आमदार रावसाहेब अंतापूरकर, रोहिदास चव्हाण आदींनी त्यांचे स्वागत केले. 

सामान्यांच्या हिताचे काम 
गोरगरीब व सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करणार असल्याचे अध्यक्षा शांताबाई जवळगावकर यांनी सांगितले, तर उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासोबतच आदिवासी तालुक्‍यामध्ये विकासाची कामे करण्यावर भर राहणार असल्याचे सांगितले. 

Web Title: Nanded zp congress-ncp