नांदेडची ही’ बॅंक घेणार एकाच दिवशी दोन बैठका

file photo
file photo

नांदेड :  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे. बँकेच्या वाटचालीच्या काळात शुक्रवारी (ता. १५) पहिल्यांदाच संचालक मंडळाच्या दोन सभा एकाच वेळी घेण्यात येणार आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकाच वेळी दोन बैठक होणार असल्यामुळे बैठकीत नेमके काय निर्णय घेतले जाणार, कुठली चर्चा होणार? या विषयी बँकेच्या ज्येष्ठ संचालक मंडळाकडून अाश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.


या विषयी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कार्यकारी संचालक अजय कदम यांनी बैठकीस दुजोरा दिला असून, पहिल्यांदाच बँक संचालक मंडळाच्या दोन सभा होत असल्या तरी, त्या मागे दुसरे तिसरे कुठलेही कारण नसून, निवडणुकी दरम्यान दोन महिने अाचारसंहिता लागू होती. त्यामुळे मागील महिन्यात बँकेची बैठक होऊ शकली नाही. त्यामुळे गेल्या महिन्यातील आणि चालू महिन्यातील एक बैठक अशा दोन्ही बैठका एकत्रित घेतल्या जाणार असल्याचे श्री कदम यांनी सांगितले.


काही महिण्यापासून उपाध्यक्ष पद रिक्त 


मागील काही महिन्यांपासून बँकेचे उपाध्यक्षपद रिक्त आहे व पुढील वर्षी एप्रील महिन्यात बँक संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. तेव्हा येत्या ता. १५ नोव्हेंबरला होणाऱ्या संचालक मंडळात उपाध्यपदाचा मार्ग मोकळा होऊन उपाध्यक्षपदाची निवड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण उपाध्यक्ष पदाची निवड करण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला कळविण्यात आले होते. बँकेच्या मागणीनुसार जिल्हा उपनिबंधकाना सप्टेंबर महिन्यातच प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांनी दीड महिन्याचा अवधी घेतल्यामुळे उपाध्यक्षपदासाठी १५ नोव्हेंबर ही तारिख निश्चित करण्यात आल्याचे समजते.

पुन्हा चिखलीकर पॅटर्नची चर्चा

असे असले तरी, बँकेच्या संचालक मंडळावरील काही ज्येष्ठ संचालकांच्या मनात या बद्दल शंका वाटत अाहे. बैठकीबद्दल अनेक ज्येष्ठ संचालकांना पूर्व सूचना मिळाल्या नसल्याचे समजते. सध्या बँकेत चिखलीकर पॅटर्नची चर्चा सुरु असून, मागील निवडणुकीप्रमाणे या उपाध्यक्षपदाच्या निवडीत देखील असेच काहीसे होईल का? या बद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. असे असले तरी, ता. १५ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता होणाऱ्या संचालक मंडळाच्या दोन्ही बैठकीत नेमक्या कोणत्या प्रश्नावर चर्चा होणार, उपाध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, की संचालक मंडळाला न कळवताच अजून काही निर्णय घेतला जाणार या सर्व प्रश्नांचा उलगडा होणार आहे.    
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com