नांदेडच्या मिनी मंत्रालयाचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी

नवनाथ येवले
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

नांदेड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव झाले आहे. जिल्हा परिषदेतील सत्ताधारी काॅँग्रेसकडे मंगाराणी अंबुलगेकर यांच्यासह एकून पाच उमेदवार अध्यक्षपदासाठी दावेदार आहेत.

नांदेड: राज्यभरातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांची आरक्षण सोडत मंगळवारी (ता.१९) राज्यस्तरावर मंत्रालयात काढण्यात आली. यामध्ये नांदेड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव झाले आहे. जिल्हा परिषदेतील सत्ताधारी काॅँग्रेसकडे मंगाराणी अंबुलगेकर यांच्यासह एकून पाच उमेदवार अध्यक्षपदासाठी दावेदार आहेत.

विधानसभा निवडणूकांमुळे कार्यकाळ संपुनही तीन महिण्यांची मुदतवाढ मिळालेल्या जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज संस्थांमध्ये ‘महिलाराज’च कायम राहणार असल्याचे चित्र आज जाहीर झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीवरून उघड झाले आहे. राज्यातील ३२ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासांठी झालेल्या सोडतीमध्ये एकून १८ जिल्हा परिषदांचे अध्यक्षपद विविध प्रवर्गांच्या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

यामध्ये अनुसूचित जाती (सर्वसाधारण) दोन, अनुसूचित जाती (महिला) दोन, अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) दाेन, अनुसूचित जमाती (महिला) तीन, नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) चार, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) पाच तर खुला (सर्वसाधारण) आठ व खुला (महिला) आठ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. नांदेड महापालिकचे महापौरपद नुकतेच ओबीसी महिलेसाठी राखीव झाले आहे, तर आज जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव झाले आहे. त्यानुसार जनाबाई डुडूळे यांच्यानंतर तब्बल २२ वर्षांनी अनुसूचित जमातीच्या महिलेस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई जवळगांवकर यांच्यानंतर अनूसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या (सर्वसाधारण) साठी अध्यक्षपद राखीव राहण्याचा कयास जानकारांकडून लावण्यात येत होता. मात्र, जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीनुसार नांदेड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव सुटल्याने सत्ताधारी काॅँग्रेस पक्षाकडे मंगाराणी आंबुलगेकर (बाराळी गट), सविता वारकड (बारड गट), विजयश्री कमठेवाड (बरबडा गट), शंकुतला कोलमवाड (येवती गट), शिला उलगुलवाड (पेठवडज गट) अशा एकून पाच महिला अध्यक्षपदासाठी दावेदार आहेत. विरोधी भाजपकडे खुल्या प्रवर्गातून निवडून आलेल्या मात्र अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या कमल हुर्दुके या एकमेव महिला अध्यक्षपदाच्या दावेदार आहेत. येत्या डिसेंबरमध्ये अध्यक्षपदाची मुदत संपणार असल्याने लवकरच अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार कळणार आहे.

राज्यातील जिल्हा परिषदांची आरक्षण सोडत  
अनुसूचित जाती (सर्वसाधारण):  सोलापूर, जालना
अनुसूचित जाती (महिला) : नागपूर, उस्मानाबाद
अनुसूचित जमाती (सर्वसाधारण): नंदुरबार, हिंगोली
अनुसूचित जमाती (महिला):  पालघर, रायगड, नांदेड
नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण): लातूर, कोल्हापूर, वाशिम, अमरावती
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला): ठाणे, सिंधुदुर्ग, सांगली, वर्धा, बीड
 खुला (सर्वसाधारण):  रत्नागिरी, नाशिक, धुळे, गडचिरोली, गोंदिया, सातारा, अकोला, भंडारा
 खुला (महिला): जळगाव, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, परभणी, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded's mini ministry is headed by a scheduled tribal woman