नांदेडचा खूनी पंजाब पोलिसांच्या जाळ्यात 

प्रल्हाद कांबळे
रविवार, 12 ऑगस्ट 2018

शहरातील विमानतळ ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रोशनसिंगनगर भागात १९ आॅगस्ट २०१६ रोजी बच्चीदरसिंग माळी याचा डोक्यात गोळी झाडून खून केला होता. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी एका कार्यक्रमात यात्री निवास येथे गोळीबार करून या मारेकऱ्यांनी दुसरा खून केला होता.

नांदेड : येथील बच्चीदरसिंग माळी याचा डोक्यात पिस्तुलाची गोळी झाडून निर्घृण हत्या करून पसार असलेला मारेकरी पंजाब पोलिसांनी शनिवारी (ता. ११) अटक केला. या प्रकरणातील मुख्य मारेकरी रिंदा हा अद्याप फरार असून त्याचा पोलिस शोध घेत आहेत. 

शहरातील विमानतळ ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रोशनसिंगनगर भागात १९ आॅगस्ट २०१६ रोजी बच्चीदरसिंग माळी याचा डोक्यात गोळी झाडून खून केला होता. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी एका कार्यक्रमात यात्री निवास येथे गोळीबार करून या मारेकऱ्यांनी दुसरा खून केला होता. या प्रकरणी विमानतळ व वजिराबाद ठाण्यात मारेकरी रिंदा सिध्दु आणि आकाश गाडीवाले यांच्यासह आदी जणांवर गुन्हा दाखल होता. घटनेनंतर हे दोघेही पसार झाले. न्यायालयाने त्यांना फरार घोषीत केले होते.

तेव्हापासून आकाश हा पंजाब राज्यात वास्तव्य करीत होता. त्याने एक गाडी पिस्तुलचा धाक दाखवून पळवून नेत असतांना पंजाब पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याने पोलिसांवर गोळीबार केला परंतु त्याचा नेम चुकला मात्र पंजाब पोलिसांच्या गोळीबारात तो जखमी झाला. त्याच्या उजव्या बरगडीवर गोळीचा मार बसल्याने तो खाली पडला आणि पोलिसांच्या जाळ्यात आला. त्याच्यावर सध्या पंजाबमध्ये उपचार सुरू असून त्याला नांदेडला आणण्यासाठी एक पथक पाठविण्यात येणार असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाने यांनी सांगितले. त्याला पकडण्यासाठी नांदेड पोलिस दोन वेळा पंजाब पालथा घालून आले होते. मात्र तो सापडला नव्हता. यातील रिंदा हा अट्टल गुन्हेगार अजूनही फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.  

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Nandeds murder was caught by the Punjab Police