सत्तार समर्थक नंदकिशोर सहारे यांची माघार, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे अब्दुल सत्तार समर्थक नंदकिशोर सहारे यांनी सोमवारी (ता. पाच) माघार घेतली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सहारे यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यांची माघार युतीचे अंबादास दानवे की आघाडीचे बाबूराव कुलकर्णी या दोघांपैकी कुणाच्या पथ्यावर पडते, हे येत्या 19 तारखेला होणाऱ्या मतदानानंतर स्पष्ट होईल. 

औरंगाबाद - स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे अब्दुल सत्तार समर्थक नंदकिशोर सहारे यांनी सोमवारी (ता. पाच) माघार घेतली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सहारे यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यांची माघार युतीचे अंबादास दानवे की आघाडीचे बाबूराव कुलकर्णी या दोघांपैकी कुणाच्या पथ्यावर पडते, हे येत्या 19 तारखेला होणाऱ्या मतदानानंतर स्पष्ट होईल. 

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी एकूण आठ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. महायुतीचे दानवे, आघाडीचे कुलकर्णी यांच्यासह सत्तार यांचे खंदे समर्थक सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सहारे, राजेश टापे यांचे समर्थक एकनाथ चिमणे, कन्नडचे नगराध्यक्ष संतोष कोल्हे यांचे समर्थक अब्दुल जावेद अब्दुल वाहेद यांनीही मेदवारी अर्ज दाखल केले होते. 

यापैकी सहारे यांच्या उमेदवारी अर्जामुळे वेगळ्या चर्चेला सुरवात झाली होती. आपल्याकडे शंभराहून अधिक सदस्य असल्याचा दावा करीत सत्तार यांनी सहारे यांची उमेदवारी दाखल केली होती; मात्र केवळ दबावतंत्र म्हणून सत्तार यांनी ही खेळी केल्याचे बोलले जात होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सहारे यांनी माघार घेतल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आता मैदानात दानवे, श्री. कुलकर्णी यांच्यासह माजी नगरसेवक शहानवाज अब्दुल रेहमान खान हे तीन उमेदवार उरले आहेत. त्यामुळे दानवे विरुद्ध कुलकर्णी अशी थेट लढत येत्या 19 तारखेच्या मतदानात पाहायला मिळेल. 
 
सत्तार समर्थक कुणाच्या गळाला? 
सत्तार यांनी शंभर सदस्य आपल्याकडे असल्याचा दावा केला असला, तरी सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाशिवाय जिल्ह्यातील काही तालुक्‍यांत त्यांचे समर्थक असल्याचे बोलले जाते. साधरणत: 40 ते 50 सदस्य सत्तार यांच्याकडे असण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस उमेदवाराच्या विरोधात बंड पुकारल्यामुळे पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. याचा सूड सत्तार महायुतीचे दानवे यांना मदत करून उगवणार की मग आघाडीच्या कुलकर्णी यांना मदतीचा हात देणार, याबद्दल तर्क लढविले जात आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nandkishore Sahare withdraw nomination