नारेगावात थातूरमातूर कारवाई करून भूखंडमाफियांना दिले अभय!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

औरंगाबाद - नारेगाव येथील सुखना नदीच्या पात्रातील अतिक्रमणे हटविण्याची नागरिकांची मागणी असताना महापालिका प्रशासन मात्र केवळ नदी खोलीकरणावर भर देत आहे. मंगळवारीही (ता. २६) थातूरमातूर कारवाई करून अतिक्रमण हटाव विभाग माघारी फिरला.

औरंगाबाद - नारेगाव येथील सुखना नदीच्या पात्रातील अतिक्रमणे हटविण्याची नागरिकांची मागणी असताना महापालिका प्रशासन मात्र केवळ नदी खोलीकरणावर भर देत आहे. मंगळवारीही (ता. २६) थातूरमातूर कारवाई करून अतिक्रमण हटाव विभाग माघारी फिरला.

नदीपात्र आले दहा फुटांवर
नारेगाव येथील सुखना नदीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणांचा सपाटा सुरू आहे. अनेकांनी पक्की बांधकामे केल्याने नदीचे पात्र चाळीस फुटांवरून दहा फुटांवर आले आहे. त्यामुळे यंदा पहिल्याच पावसात थेट नागरिकांच्या घरांत पाणी शिरले. त्यामुळे नागरिक संतप्त झाले असून, सोमवारी (ता. २५) महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता. त्याआधीच महापौर नंदकुमार घोडेले यांनी नारेगावला भेट घेऊन तातडीने अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले. त्यामुळे नागरिकांनी माघार घेतली. 

मात्र सोमवारी दिवसभरात केवळ चार अतिक्रमणे हटविण्यात आल्याने या ठिकाणी वादावादी झाली. मंगळवारी तरी धडाक्‍यात कारवाई होईल, अशी नागरिकांना अपेक्षा होती. मात्र अतिक्रमण हटाव विभागाने नाल्यातील गाळ काढण्याचा निर्णय घेतला. जेसीबी पुढे जात नसल्याने काम संथगतीने सुरू आहे. अतिक्रमणाचा काढलेला मलबा वाहून नेण्यातही अडचणी आहेत.

त्यामुळे कामाला विलंब लागणार आहे. असे असले तरी येत्या दोन दिवसांत नाल्यावरील अतिक्रमणे काढून घरांत पाणी शिरणार नाही, याची व्यवस्था केली जाईल, असे अतिक्रमण विभागप्रमुख सी. एम. अभंग यांनी स्पष्ट केले. 

जेथे पाणी अडवले गेले होते तो भाग मोकळा करण्यात आला आहे. त्यामुळे आता मोठा पाऊस झाला तरी जास्त घरांत पाणी शिरणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

यंत्रणा ठरली कुचकामी 
महापालिकेने अतिक्रमण काढण्यासाठी व नाल्यातील गाळ उपसण्यासाठी पोकलेन मशीनचा वापर सुरू केला आहे. मात्र सोमवारी व मंगळवारी हे मशीन दिवसातून किमान चारवेळा बंद पडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Web Title: naregaon crime landmafia encroachment