नारेगावचे झाले ‘नालेगाव’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

औरंगाबाद - सुखना नदीच्या वरच्या भागातील कोलठाणवाडी आणि पोखरी येथे शनिवारी (ता.२३) पाऊस झाल्याने नदीला पूर आला. परिणामी, नारेगाव येथे रात्री २०० ते ३०० घरांमध्ये पाणी घुसले. त्यामुळे एकच हाहाकार उडाला. त्यामुळे नागरिकांनी उंच इमारती, मशीद, मदरशात आश्रय घेतला. एवढे होऊनदेखील रविवारी (ता. २४) महापालिकेने साधी विचारपूसही केली नसल्याने नागरिक संताप व्यक्‍त करीत आहेत.

औरंगाबाद - सुखना नदीच्या वरच्या भागातील कोलठाणवाडी आणि पोखरी येथे शनिवारी (ता.२३) पाऊस झाल्याने नदीला पूर आला. परिणामी, नारेगाव येथे रात्री २०० ते ३०० घरांमध्ये पाणी घुसले. त्यामुळे एकच हाहाकार उडाला. त्यामुळे नागरिकांनी उंच इमारती, मशीद, मदरशात आश्रय घेतला. एवढे होऊनदेखील रविवारी (ता. २४) महापालिकेने साधी विचारपूसही केली नसल्याने नागरिक संताप व्यक्‍त करीत आहेत.

नारेगावातून वाहणाऱ्या सुखना नदीचा उगम कोलठाणवाडी येथून झालेला आहे. पूर्वी खळाळून वाहणाऱ्या नदीपात्रात अनधिकृत प्लॉटिंग झाल्याने नदीचा नाला झाला. शनिवारी सायंकाळनंतर कोलठाणवाडी, पोखरी शिवारात मोठा पाऊस झाला. त्यामुळे नाल्यात अचानक पाण्याचा लोंढा आला. नाल्यातून पाण्याला वाट मिळेनाशी झाल्याने पटेलनगर, अजीज कॉलनी, आयेशा पार्क, बिस्मिल्ला कॉलनी, रहेमतनगर या नागरी वसाहतींच्या रस्त्याने पाणी घरांमध्ये शिरले. 

पुलावरून पाणी
नारेगावातील मुख्य रस्त्यावर महापालिकेने पूल बांधला आहे; मात्र त्यावर दोनच नळकांडी पाइप आहेत. त्यांचा आधीच व्यास लहान आणि त्यात कचरा अडकल्याने पुलावरून पाणी वाहत जाऊन आजूबाजूच्या घरांमध्ये घुसले. पुलाच्या एका बाजूला नागरी वसाहतीमध्ये पाणीच पाणी, तर पुलाच्या दुसऱ्या टोकाला काहीच पाणी नाही असे दृश्‍य होते. रात्री उशीरा जेसीबीने रस्ता फोडून पाण्याला वाट करून देण्यात आली. 

नागरिक संतप्त 
तीन दिवसांपूर्वीही या नाल्याला पूर येऊन अशीच स्थिती निर्माण झाली होती. महापालिकेने वेळीच उपाययोजना केली असती; तर शनिवारची परिस्थिती उद्‌भवली नसती, असे सांगत नागरिक महापालिकेविरुद्ध रोष व्यक्त करीत आहेत.सिलिंडर, कपडे, अन्नधान्य नाल्यात लोकांना रात्र जागून काढावी लागली. अनेकांच्या घरातून अन्नधान्य, कपडे, भांडीकुंडी वाहून गेली. स्वयंपाकघरात पाणी घुसल्याने एक वस्तू पकडून ठेवली तर दुसरी वाहून जात होती. इतकेच काय स्वयंपाकाचे सिलिंडरही वाहून गेल्याचे नागरिकांनी सांगितले.

चार तासांनंतर ओसरले पाणी 
अनेक घरांमध्ये गुडघाभर पाणी साचले होते. यानंतर नगरसेवक गोकुळ मलके यांनी रात्री अडीच वाजेच्या सुमारास उपअभियंता सुनील जाधव यांना बोलावून जेसीबीने नाला मोकळा केल्यानंतर चार तासांनी पाणी ओसरले. जयभवानीनगर, एन- आठ या भागापेक्षा विदारक स्थिती नारेगावच्या काही भागांत दिसून आली. २०१५ पासून नाला मोकळा करण्यासाठी मलके यांनी मनपाला पत्र दिले आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्याने शनिवारी सुखना नदीच्या वरच्या भागात झालेल्या जोरदार पावसाने नारेगाववासीयांची दाणादाण उडवून दिली होती. तीन दिवसांपूर्वीही झालेल्या पावसाने अशीच अवस्था केली होती. रविवारीही आपण नगरसेवक राजू शिंदे, शहर अभियंता एस. डी. पानझडे यांच्यासोबत या भागात पाहणी केली. या नाल्यातील अतिक्रमण काढण्यासाठी सोमवारी (ता.२५) महापालिकेवर मोर्चा काढून आयुक्‍तांना भेटणार असल्याचे श्री. मलके यांनी सांगितले.

नागरिक म्हणतात...
पाणी घरांमध्ये, दुकानांमध्ये घुसले. भांडी, कपडे वाहून गेले. लहान मुलांना रात्री मुख्य रस्त्यावर थांबावे लागले. पहाटेपर्यंत सर्वजण रस्त्यावरच होते. पाणी ओसरल्यानंतर घराकडे जाता आले. तीन दिवसांपूर्वीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतरही महापालिकेने काहीच केले नाही. आताही कुणी साधी माहिती घेण्यासाठीही आले नाही. 
- मौलाना रसूल 

भांडेकुंडे वाहून गेले. रात्री ११ वाजता घरांमध्ये अचानक पाणी शिरले. किराणा सामान पाण्यात वाहून गेले आहे. शेरखान पठाण यांचे उंच घर असल्याने त्यांनी आम्हाला रात्री आश्रय दिला. मदत तर दूरची गोष्ट; परंतु झालेल्या नुकसानीची पाहणी करायलाही महापालिकेचे कोणीही आमच्या भागात आले नाहीत. 
- जहेनबी

बिस्मिल्ला कॉलनीमध्ये माझे घर आहे. पार पलंगापर्यंत पाणी साचले होते. भांडे पाण्यावर तरंगत होते. एक पकडले तर दुसरे हातातून निसटत होते. स्वयंपाकाचे नवीनच गॅस सिलिंडर आणले आहे, तेही पाण्यावर तरंगत वाहून जाण्याच्या बेतात होते.  
- बुढन शाह

आज दिसणारा नाला आधीची सुखना नदी आहे. आता नदीची नाली झाली आहे. आता तिचे पात्र फक्‍त पाच-दहा फूट राहिले आहे. त्याच्या रुंदीकरणासाठी महापालिकेने सर्व्हेदेखील केला नाही. नाल्यातील अतिक्रमणे काढून पूर्वीप्रमाणे ३५ फूट पात्र मोकळे करावे व भोवताली संरक्षक भिंत बांधावी, जेणेकरून भविष्यात असे नुकसान होणार नाही.  
- असलमखान करीमखान

घरामध्ये पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे. रिक्षा पाण्यात बुडाली होती. यामुळे आता रोजीरोटीचे साधनही बंद पडले आहे. आताही सगळीकडे चिखलच चिखल झाला असल्याने घराबाहेरही पडता येत नाही. 
- फरजाना शकील युनूस

Web Title: naregaon nalegaon rain water flood