दाभोलकरांच्या हत्येवेळी अंदुरे फेसबुकपासून होता दूर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

दर दिवशी पोस्ट; पण तेव्हा नाही...
- हत्या, विघातक कृत्यावेळी, त्या कालावधीत फेसबुकवर पोस्ट दिसल्या नाहीत.
- हिंदुत्ववादाच्या समर्थनार्थ पोस्ट; पण तपास यंत्रणांच्या कृतीवर कोणत्याही पोस्ट दिसल्या नाहीत.
- गौरी लंकेश, गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर अटकेतील लोकांबाबतही अवाक्षर पोस्टद्वारे काढले नाही.

औरंगाबाद : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील संशयित सचिन अंदुरे हा कट्टर हिंदुत्ववादी असून, फेसबुकवर सतत वादग्रस्त आणि जहाल पोस्ट करीत होता. दरम्यान, दाभोलकरांच्या हत्येच्या दोन दिवसांपूर्वी अर्थात 18 ऑगस्ट 2013 ला सचिनने एक पोस्ट टाकली होती; पण ती दाभोलकरांशी निगडित नव्हती. त्यानंतर त्याने 28 दिवस फेसबुकचा वापरच केला नव्हता. दरम्यान, यंदा 11 व 12 मे रोजी शहरात झालेल्या दंगलीच्या 13 दिवस आधी व नंतर 20 दिवस त्याने फेसबुकवर कोणतीही पोस्ट केली नसल्याचे दिसून आले. 

सचिनला हिंदू आणि सनातन धर्माचा अभिमान असल्याचे कुटुंबीय सांगतात. त्याच्या फेसबुक अकाउंटची सखोल माहिती घेतली असता तो जहाल हिंदुत्ववादी पोस्ट करीत असल्याचे स्पष्ट झाले. हिंदुत्वाच्या समर्थनार्थ फेसबुकवर तो सतत धार्मिक भावना भडकवणारे वादग्रस्त लिखाण करीत होता. एवढेच नाही, तर सामाजिक कार्यकर्ते, प्रखर हिंदुत्व न मानणारे राजकीय नेते आणि त्या विचारसरणीशी सुसंगत राजकीय पक्षांविरोधातही त्याने पोस्ट केलेल्या आहेत. औरंगाबादेतील राजाबाजार, शहागंज भागात 11 व 12 मे रोजी दंगल उसळली. सतत फेसबुकवर पोस्ट करणाऱ्या सचिनने या काळात एकूण 33 दिवस पोस्ट आणि शेअर केलेले नव्हते. त्याने 28 एप्रिल 2018 ला एक पोस्ट टाकली. मात्र, त्यानंतर एक जूनपासून पुन्हा नियमित पोस्ट केल्याचे फेसबुक अकाउंटवरून स्पष्ट झाले आहे.

दर दिवशी पोस्ट; पण तेव्हा नाही...
- हत्या, विघातक कृत्यावेळी, त्या कालावधीत फेसबुकवर पोस्ट दिसल्या नाहीत.
- हिंदुत्ववादाच्या समर्थनार्थ पोस्ट; पण तपास यंत्रणांच्या कृतीवर कोणत्याही पोस्ट दिसल्या नाहीत.
- गौरी लंकेश, गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर अटकेतील लोकांबाबतही अवाक्षर पोस्टद्वारे काढले नाही.

Web Title: Narendra Dabholkar Murder case Sachin Andure arrested facebook post