मोदींसारखे स्वार्थी होऊ नका - प्रकाश आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

औरंगाबाद - अमेरिकेत कुटुंबवत्सल व नीतिमत्तेच्या संकल्पनेला पाहून लोक अध्यक्षांची निवड करतात. आपल्याकडे हे पाहिले जात नाही. मोर्चे काढून, निवेदने देऊन अत्याचार थांबणार नाहीत; तर सत्ता मिळवून हे अत्याचार थांबविता येतील. वंचितांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून न्याय देण्याचा निर्धार केल्याचे भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. सुरवातीलाच सेल्फी म्हणजे सेल्फिश, मोदींसारखे स्वार्थी होऊ नका, अशी टीकाही त्यांनी केली.

ओबीसी, एसटी, व्हीजेएनटी, एसबीसी समाजाच्या राजकीय, शैक्षणिक, सामाजिक समस्यांसंदर्भात स्थापन झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या संवाद यात्रेत सोमवारी ते बोलत होते. मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्रात हा कार्यक्रम पार पडला. कैकाडी, मुस्लिम, वडार, धनगर, नाथजोगी, आदिवासी कोळी, खाटीक, ओबीसी या संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या व्यथा संवाद यात्रेत मांडल्या. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीला साथ देण्याचा निर्धार केला.

बहुजन आघाडीला किमान 12 जागा द्याव्यात
आगामी लोकसभा निवडणुकीत किमान 12 जागा वंचित बहुजन आघाडीला सोडण्याचा खुला प्रस्ताव आहे. त्यावर ठाम असून, धर्मनिरपेक्ष व लोकशाही मानणाऱ्या पक्षांसोबत जाण्याचा विचार आहे. कॉंग्रेसने गरज नसल्याची भूमिका घेतली तर बोलणी अशक्‍य आहे. मोदी सरकार रॅफेलची प्रकरणात अदानी-अंबानींसाठी देशाची सुरक्षा धोक्‍यात घालत असल्याची टीकाही आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

Web Title: narendra modi selfish prakash ambedkar politics