नाथसागरातून पाणी उपसा घटला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जुलै 2019

खोदण्याचे काम सुरू
पाऊस आणखी लांबणीवर पडला तर काय करायचे, याचा आराखडा महापालिकेने तयार केला आहे. त्यानुसार जलसंपदा विभागाकडे पत्रव्यवहार करून ॲप्रोच कॅनॉलला जास्तीचे पाणी आणण्यासाठी धरणात चारी खोदण्याची परवानगी मागण्यात आली होती. त्यानुसार हे काम सोमवारपासून सुरू करण्यात आले आहे. जेसीबी, पोकलेन, दोन ट्रक या कामासाठी धरणपात्रात नेण्यात आले असून, धरणातील पाणीपातळीपर्यंत तात्पुरता रस्ता तयार करून चारी खोदण्यात येणार आहे. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उपअभियंता बाबूराव घुले, किरण धांडे, बाविस्कर, एस. पी. गायकवाड यांच्यासह कर्मचारी यासाठी परिश्रम घेत आहेत.

औरंगाबाद - जुलै महिन्याचा पहिला आठवडा उलटला असला तरी दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नाथसागरातील पाणीपातळी दिवसेंदिवस खोलवर जात असून, महापालिकेच्या पंपापर्यंत येणारे पाणी कमी-कमी होत आहे. पाण्याचा दाबच नसल्यामुळे तब्बल १० एमएलडीने पाणी उपसा घटला आहे. दरम्यान, ॲप्रोच कॅनॉलच्या खोलीकरणाचे काम सोमवारपासून (ता. आठ) सुरू करण्यात आले आहे. 

गतवर्षीच्या भीषण दुष्काळानंतरही यंदा वरुणराजाने दमदार हजेरी लावलेली नाही. त्यामुळे जायकवाडी धरणातील मृत जलसाठाही झपाट्याने कमी होत आहे. महापालिका गेल्या दोन महिन्यांपासून मृत जलसाठ्यातून पाणी उपसा करीत आहे. मात्र, सध्या कालव्याला येणारे पाणी बंद झाले आहे. त्यामुळे भिस्त फक्त ॲप्रोच कॅनॉलवरच आहे. ॲप्रोच कॅनॉलला येणारे पाणीदेखील कमी होत असल्यामुळे पाणी उपसा दहा एमएलडीने घटला आहे. दरम्यान, फ्लोटिंग पंपामध्ये अडकणारे गवत आणि गाळ यामुळे पाणी उपसा वारंवार बंद करावा लागत आहे. धरणात मुबलक पाणी असताना महापालिका १५० ते १५५ एमएलडी पाणी उपसा करते. मृत जलसाठ्यातून सुरवातीला १२० ते १२५ एमएलडी एवढा पाणी उपसा होत होता. आता त्यात पुन्हा घट झाली आहे. मृत जलसाठ्यातूनही आतापर्यंत २०६.७५ दलघमी इतका पाणी उपसा करण्यात आला आहे. मृत जलसाठ्याची पातळी ४५३.९३८ मीटर इतकी झाली आहे. ॲप्रोच कॅनॉलसाठी पाणीपातळीची मर्यादा ४५३.५० मीटर एवढी आहे.

सिडकोत तब्बल सात दिवसांआड पाणी 
औरंगाबाद - संपूर्ण शहराला समान पाणी देण्यासाठी प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे प्रशासनाने सिडको-हडकोसह इतर भागांत सात दिवसांआड पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाणीटंचाईत आणखी भर पडणार आहे. 

राज्यमंत्री अतुल सावे यांनी महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेऊन संपूर्ण शहराला समान पाणी देण्याचे निर्देश दिले होते. मात्र प्रशासनाने मंगळवारपासून (ता. आठ) हडको, सिडको, बायजीपुरा, संजयनगर, जिन्सी परिसराच्या काही भागांत पाणीपुरवठा पाच ते सहा दिवसांआडवरून थेट सात दिवसांआड तसेच पुंडलिकनगर आणि शिवाजीनगर भागाला दोन दिवसांआड होणारा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे लोटण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nathsagar Dam Water Decrease