अमेझिंग जन गण मन ऐकता, पाहता हरखले तन-मन

aurangabad
aurangabad

औरंगाबाद : जन गण मन... अवघे 52 सेकंद. याच 52 सेकंदात दिसतात औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा स्थळे आणि शहराच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेली शंभराहून अधिक कर्तृत्ववान माणसं.  औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीच्या तरुणांनी बनवलेल्या या राष्ट्रगीताचे लोकार्पण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे माजी संचालक डॉ. के. के. मोहम्मद यांच्या हस्ते थाटात झाले.

एमजीएम संस्थेच्या रुक्मिणी सभागृहात सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक, एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, उद्योजक राम भोगले, सी. पी. त्रिपाठी, छावणीचे डेप्युटी स्टेशन कमांडर कर्नल विभागर त्यागी यांची प्रमुख उपस्थिती होती. 

राष्ट्रगीताच्या लोकार्पणापूर्वी द मेकिंग ऑफ अमेझिंग औरंगाबादची चित्रफीत दाखविण्यात आली. या प्रकल्पातील दिवंगत प्रा. दिनकर बोरीकर, डॉ. दा. वि. गर्गे, पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे, पखवाज वादक विनय शंकपाल यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आपापल्या क्रीडा प्रकारात उत्तुंग कामगिरी करत शहराचे नाव उंचावणाऱ्या एव्हरेस्टवीर मनीषा वाघमारे, जिम्नॅस्टिकपटू रिद्धी आणि सिद्धी हत्तेकर, खोखोपटू सुकन्या जाधव यांचा सत्कार करण्यात आला. न्या. वराळे आणि राम भोगले यांनी प्रकल्पात काम करणाऱ्या सर्वांचे कौतुक केले.

डॉ. शिवाकांत बाजपेयी यांनी लहान मुलांसाठी लिहिलेल्या बीबी का मकबऱ्यावरील चित्रकथारूप पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. अपर्णा बाजपेयी आणि वर्षा ठाकूर-घुगे यांनी या पुस्तकाचा अनुवादही केला आहे. या पुस्तकाच्या विक्रीतून मिळणारा निधी स्वमग्म मुलांसाठी कार्य करणाऱ्या आरंभ ऑटिझम सेंटरला दिला जाणार आहे. 

देशात पहिल्यांदाच एखाद्या शहरातील ऐतिहासिक वास्तूंचा वारसा राष्ट्रगीतामधून दाखविण्यात आला. या कार्यक्रमाला विद्यार्थी, नागरिक, उद्योजक, प्रशासकीय अधिकारी आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बटेश्वरच्या कहाणीने अंगावर शहारे
ऐतिहासिक वास्तू धडधड पाडून टाकण्याचा सपाटा लावलेल्या औरंगाबाद शहरात के. के. मुहम्मद यांनी सांगितलेल्या बटेश्वरच्या कहाणीने उपस्थित इतिहासप्रेमींच्या अंगावर शहारे आणले. मध्यप्रदेशात चंबळच्या खोऱ्यातील डाकूंच्या इलाख्यात असलेल्या बटेश्‍वर या 200 उद्‌ध्वस्त पुरातन मंदिरांच्या वारसास्थळाचे जतन करताना डॉ. के. के. मुहम्मद यांना अनेकदा प्राणांची बाजी लावावी लागली. डाकूंचे मनःपरिवर्तन करून, त्यांना सोबत घेत वारसा जतनाचे काम करत असताना त्यांना शासकीय पातळीवरही मोठा संघर्ष करावा लागला. मात्र, वारशाविषयी असलेल्या प्रेमातून त्यांनी कठिण प्रसंगांना तोंड देत त्या 200 मंदिरांचे जतन आणि संवर्धन कशा प्रकारे केले, याची कहाणी खुद्द त्यांच्याच तोंडून ऐकायला मिळाल्याने सर्वजण प्रभावित झाले होते.

या महनीय व्यक्तींनी गायले राष्ट्रगीत
ऐतिहासिक वास्तूंच्या ठिकाणी शहरातील महनीय व्यक्तींनी राष्ट्रगीताचे कडवे गायले आहे. यामध्ये पद्मश्री डॉ. यू. म. पठाण, फातेमा झकेरिया, दिवंगत दिनकर बोरीकर, बा. वि. गर्गे, पंडित नाथराव नेरळकर, पंडित विश्वनाथ ओक, स्वातंत्र्यसैनिक  ना. वि. देशपांडे, ताराबाई लड्डा, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, प्रा. दिलीप घारे, कवी डॉ. दासू वैद्य, इतिहासकार रा. श्री. मोरवंचीकर, डॉ. दुलारी कुरेशी, रफत कुरेशी, जलतज्ज्ञ प्रा. प्रदीप पुरंदरे, पक्षीमित्र दिलीप यार्दी, उद्योजक राम भोगले, चित्रकार विजय कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय छायाचित्रकार बैजू पाटील, एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, प्राचार्य प्रतापराव बोराडे, साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे, बाबा भांड, कुलगुरू डॉ. वि. ल. धारूरकर, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. स्मिता अवचार यांच्यासह उद्योजक, घाटीतील डॉक्टर, परिचारिका, विद्यार्थी आदींचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com