पेशींच्या सूक्ष्म अभ्यासाने उपचारात येईल सुस्पष्टता 

अभिजित हिरप, सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - मूलभूत विज्ञान दिवसेंदिवस प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. कर्करोग, अल्झायमर आणि मेंदूशी संबंधित दुर्धर आजारांवर उपचाराच्या असंख्य पद्धती प्रचलित आहेत. मात्र, कधीकधी काही आजारांवरील उपचारांवर अनेक औषधोपचार निकामी होऊ लागतात. त्यामुळे पेशींवर असलेल्या मेंब्रेनचा खोलात अभ्यास केल्यास औषधांचे लक्ष्य (ड्रग टार्गेट) मिळू शकेल. त्यामुळे आजारांवर उपचार करताना त्यात अधिक स्पष्टता येईल, असे मत संशोधक सचिन होळकर यांनी सोमवारी (ता. 27) व्यक्‍त केले. 

औरंगाबाद - मूलभूत विज्ञान दिवसेंदिवस प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. कर्करोग, अल्झायमर आणि मेंदूशी संबंधित दुर्धर आजारांवर उपचाराच्या असंख्य पद्धती प्रचलित आहेत. मात्र, कधीकधी काही आजारांवरील उपचारांवर अनेक औषधोपचार निकामी होऊ लागतात. त्यामुळे पेशींवर असलेल्या मेंब्रेनचा खोलात अभ्यास केल्यास औषधांचे लक्ष्य (ड्रग टार्गेट) मिळू शकेल. त्यामुळे आजारांवर उपचार करताना त्यात अधिक स्पष्टता येईल, असे मत संशोधक सचिन होळकर यांनी सोमवारी (ता. 27) व्यक्‍त केले. 

मूळ औरंगाबादचे असलेले सचिन होळकर यांनी औरंगाबादच्या शासकीय विज्ञान संस्थेतून मास्टर ऑफ सायन्स (बायोफिजीक्‍स) पूर्ण केले. त्यानंतर 2011 ते 2015 पर्यंत पुण्यातील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च येथे पीएच.डी पूर्ण केले. त्यानंतर एक वर्ष पीटर्सबर्ग विद्यापीठात पोस्ट डॉक्‍टरेट असोसिएट म्हणून कामकाज पाहिले. यादरम्यान अमेरिकन सोसायटी फॉर बायोकेमिस्ट्री अँड मोलेक्‍युलार बायोलॉजीच्या नामांकित जर्नल ऑफ बायोलॉजिकल केमिस्ट्रीनेही त्यांच्या शोधनिबंधाची दखल घेतली आहे. 

त्यांनी सांगितले की, शरीरातील पेशींच्या पृष्ठभागावर पुष्कळ रिसेप्टर असतात. तसेच पेशींच्या आत रिसेप्टरसाठी वेगवेगळ्या प्रकारचे ऍडाप्टर असतात. क्‍लॅथरीन नामक प्रोटीन विविध रिसेप्टर आणि ऍडप्टारला निवडून क्‍लॅथरीनचे व्हेसिकल तयार होते. त्याद्वारे पेशीमध्ये विविध कार्ये शक्‍य होतात. उदाहरणार्थ ः पेशींना पोषकतत्त्वे पुरविणे, विविध संदेश देणे आदी यामध्ये झालेला बिघाड आजाराचे कारण असू शकते. या ऍडाप्टरद्वारे क्‍लॅथरीनचे बहुवारीकरण कसे होते, यावर सखोल अभ्यास करण्यात आला. अभ्यासाअंती विविध आजारांसाठी औषधे शोधण्यास हे संशोधन उपयोगी पडू शकते, असे मत श्री. होळकर यांनी व्यक्‍त केले. 

बहुतांश आजाराचे मूळ हे पेशींच्या अवतीभवती असते. त्याचा सूक्ष्म अभ्यास झाल्यास प्रत्येक आजाराचे मूळ शोधता येणे शक्‍य आहे. आजाराचे मूळ शोधल्यानंतर ठराविक औषधाची निर्मिती (ड्रग टार्गेट) करून आजार लवकरात लवकर व समूळ नष्ट करणे शक्‍य होऊ शकते. 

बऱ्याचवेळा कर्करोगासारख्या आजारावर सुरवातीला डॉक्‍टर रुग्णाला एखाद्या औषध सुरू करतात. ठराविक कालावधीनंतर या औषधाचा त्या आजारावर परिणाम होत नाही. त्यानंतर डॉक्‍टरकडून दुसरे, तिसरे... असे वेगवेगळे औषधोपचार सुरू होतात. त्यामुळे आजार बरा होईलच, असे नाही. मात्र या औषधोपचाराने काहीकाळ एका आजारी पेशींपासून असंख्य पेशी तयार होण्यास अटकाव होतो. मात्र, क्‍लॅथरीनच्या बहुवारीकरणामुळे आजाराचे मूळ शोधता येते. त्यावर अधिक संशोधन झाल्यास, त्या ठिकाणी आजाराला ताबडतोब रोखता येऊ शकते. हे रोखल्यास त्यापलीकडे आजार जाऊ शकत नाही. यामध्ये आणखी संशोधन झाल्यास दुर्धर आजार सुरवातीच्या काळातच थांबविता येणे शक्‍य आहे, असेही श्री. होळकर यांनी सांगितले. 

नव्या पिढीने अप्लाईड सायन्सवर जास्तीत जास्त भर द्यायला हवा. केंद्र आणि राज्य सरकारकडून विज्ञानाचा विकास होण्यासाठी वेगवेगळ्या योजना, उपक्रम आणि स्पर्धा राबविल्या जातात. त्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभागी व्हायला पाहिजे. 
- सचिन होळकर, संशोधक 

Web Title: National Science Day