इब्राहिमखान गारद्याचे अस्सल चित्र औरंगाबादेत, मूळ गाव कोणते?

समीर राजूरकर
Sunday, 8 December 2019

हिंदुस्थानावर आक्रमण करून दिल्लीपर्यंत दुराणी साम्राज्य नेण्याच्या अहमदशाह अब्दालीच्या स्वप्नात एक मोठा अडसर होता, तो म्हणजे पानिपतचे रणांगण आणि लाखभर मराठा फौज. जे या रणांगणावर लढले, वीरगतीला प्राप्त झाले, त्यांचे शौर्य अचाट आहेच. परंतु इब्राहिमखान गारदी हे एक पात्र या संपूर्ण रणधुमाळीत आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. पण हा इब्राहिमखान गारदी मराठवाड्याचा सुपुत्र होता, असे जुन्या इतिहास अभ्यासकांनी सांगून ठेवले आहे. 
आता मराठवाड्याचा म्हणजे कुठला?

औरंगाबाद : पानिपत युद्धाबाबतचे एक पुस्तक वाचत होतो. लढाई आणि त्याचे परिणाम समजून घेत असताना एका मित्राशीही याबद्दल चर्चा सुरू होती. शहरातील पुराणवस्तूंचे संग्राहक आणि इथल्या इतिहासाचे गाढे अभ्यासक स्व. डॉ. शांतीलाल पुरवार यांची एक आठवण त्याने सांगितली. डॉ. पुरवार यांच्याशी एकदा गप्पा सुरू असताना त्यांनी पानिपतच्या युद्धाबाबतचे काही किस्से सांगितले.

मराठ्यांचा तोफखाना प्रमुख असलेल्या इब्राहिमखानाचे शौर्य आणि हुशारी वादातीत होती. त्याचे शौर्य मोठे होते. पुण्यात विश्वासराव पेशवे आणि सदाशिवरावभाऊ यांची चित्रे सापडतात. पण हा इब्राहिमखान गारदी दिसत कसा असेल? त्याचे चित्र कधी कुणाला सापडल्याचे ऐकिवात, पाहण्यात नव्हते. पण असे नाही. इब्राहिमखानाचे एक चित्र आहे. अगदी खरेखुरे! आणि ते चित्र औरंगाबादेत आहे. 

No photo description available.
पानिपत युद्धाचे एक जुने चित्र

इब्राहिमखान आणि पानिपतचे रणांगण... 

रियासतकार सरदेसाई यांनी आपल्या मराठा रियासतीच्या सहाव्या खंडात इब्राहिम खान गारद्याबद्दल लिहून ठेवले आहे. हैदराबादच्या निजामाच्या पदरी असलेला इब्राहिमखान हा मुळात मार्कविस दे बुसी या फ्रेंच सेनापतीचा चेला. या बुसीने हिंदुस्थानात तीन वर्षे (१७४७-४९) केवळ आपल्याला अपेक्षित असे घडवण्याजोगे शागीर्द शोधण्यात खर्ची घातले होते. मुझफ्फर खान गारदी हा इब्राहिमचा मामा अधिक सामर्थ्यवान होता, असे बोलले जात. पण बुसीने इब्राहिमखानाला मुझफ्फरकडून मागून घेतल्याची नोंद सरदार सलाबत जंगने केली आहे. त्यापुढे इब्राहिमखान पेशवाईत कसा आला हे आपण जाणतोच.

Image may contain: one or more people
सदाशिवराव भाऊ पेशवे

हेही वाचा - मुहम्मद तुघलकासोबत आलेली 'ती' बनली औरंगाबादकरांची लाडकी

१८ मार्च १७६१ रोजी परतूरच्या उत्तरेला सव्वीस मैलांवर असलेले जाधवांचे ठाणे 'सिंदखेड' येथून सदाशिवरावभाऊ उत्तरेला निघाले आणि बरोब्बर दहा महिन्यांनी पानिपतच्या रणांगणावर त्यांना वीरमरण आलं. रस्त्याने जाताना रसद आणि लष्कर जमवत मराठा सैन्य दिल्ली जिंकण्यासाठी पोहोचले. २९ जुलै १७६० रोजी मराठ्यांच्या तोफा लाल किल्ल्याला भिडल्या आणि इब्राहिमखानाच्या तीन तोफांच्या माऱ्याने या किल्ल्याचे दमदार बुरुज वेगाने ढासळले. इब्राहिमखानाचा हा मारा अब्दाली यमुनेच्या पलीकडून हतबल होऊन पहात होता. अब्दालीचा वजीर असलेल्या शहावलीखानाचा भाऊ याकुबअली खान आणि त्याच्या एक हजारभर लष्कराचा फज्जा उडवत दुराणी सैन्याचे मानसिक स्वास्थ्य बिघडवण्यात मराठे यशस्वी झाले, ज्यात इब्राहिमखानाचा सिंहाचा वाटा होता. 

No photo description available.

मराठ्यांचा इमानी मोहरा

दिल्ली जिंकून सुमारे सव्वादोन महिने मराठा लष्कर तिथे राहिले पण अन्न आणि पैशाच्या शोधत मराठ्यांनी पुढे कुंजपुरा किल्ला गाठला. १३ ऑक्टोबर १७६० रोजी लिहिलेल्या एका पत्रात भाऊसाहेबांनी कुंजपुऱ्याच्या पाडावासाठी जात असल्याचे लिहिले आहे. कुंजपुऱ्याकडे शिंदे-होळकर-विंचूरकर आघाडीवर गेले, तर सदाशिवराव भाऊ आणि त्यांच्या मागे इब्राहिमखानाचा तोफखाना होता. कुंजपुऱ्याकडे मराठे गेल्याची कुणकुण अब्दालीला लागली आणि त्याने रसदही पाठवली.

नवलच आहे - खंडोबा ऐन चंपाषष्ठीला मंदिरातून कुठे जातात?

'रसद मिळेपर्यंत किल्ला लढावा' या त्याच्या संदेशाचे पत्र मराठ्यांना गावले होते. कुमक येण्यापूर्वीच इब्राहिमखानाच्या तोफांनी या किल्ल्यावर आग ओकली आणि तीन सरदारांच्या आघाड्यांनी मोहीम फत्ते केली. १९ ऑक्टोबर १७६० चा दसरा मराठा लष्कराने इथेच कुंजपुऱ्यात साजरा केला. इब्राहिमखानाचा हा पराक्रम पाहून अब्दालीने त्याला आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. नजीबखानामार्फत पानिपतचा एक सावकार इब्राहिमखानाकडे त्याला फितवण्यासाठी पाठवला असल्याचे इतिहास सांगतो. पण अब्दालीचे हे प्रयत्न निष्फळ ठरले होते. 

क्लिक करा - बाबासाहेबांनी धुडकावली होती दिलीपकुमारची ऑफर

पानिपतावर आमने सामने आल्याने या दोन महाकाय सैन्याच्या वाटा रोखल्या गेल्या. अब्दालीने मराठ्यांना भेदून जाण्याचे अनेक प्रयत्न केले पण त्याला काही मेळ लागला नाही. मराठा सैन्याच्या जवळ जाऊ पाहणाऱ्या अफगाणी सैन्याच्या चिंधड्या करण्यात इब्राहिमखानाच्या तोफा कसूर करत नसत. यामुळे अब्दालीला आपला मोर्चा हलवून यमुनेच्या काठी न्यावा लागला, अन ही लढाई आता डिसेंबर १७६० मध्ये नाकाबंदीची होऊन बसली. इब्राहिमखानाच्या तोफांच्या जोरावर मराठ्यांनी मजबूत मोर्चेबांधणी केली. या तोफांमुळेच अब्दालीचे बंदिस्त मराठा छावणीत घुसण्याचे धाडस अखेरपर्यंत झाले नाही. 

Image result for ibrahim khan gardi

देशातील अव्वल तोफची

नोव्हेंबर १७५९ साली पेशव्यांच्या सेवेत दाखल झालेला इब्राहिमखान गारदी हा त्यावेळी देशातील अव्वल तोफची मंडळीपैकी एक होता. आठ हजार सैन्यानिशी पानिपतावर गेलेल्या या सेनापतीने मुख्य युद्धाचा पूर्वार्ध गाजवला होता. १४ जानेवारी १७६१ रोजी झालेल्या युद्धात अफगाणी लष्कराच्या उजव्या बाजूला आपल्या तोफांचा जबरदस्त मारा करून इब्राहिमखान गारदीने अब्दालीला घाम फोडला होता. सर्वप्रथम दुराणी सैन्यावर चालून जाणाऱ्या या योध्याने अब्दालीच्या सैन्यात सामील होण्यास नकार दिला आणि तिथेच त्याचा अंत करण्याचे फर्मान अब्दालीने सोडले. पराभवाची चिन्हे गडद झाली असतानाही गारद्यांनी अब्दालीच्या सैन्याशी झुंज चालू ठेवली होती. एक एक करीत गारद्यांनी देशासाठी जीव दिला. पण ते मागे हटले नाहीत. इब्राहीमखानला अफगाणी सैन्यानं जिवंत पकडून हालहाल करून ठार मारले. 

Image may contain: 1 person
इब्राहिम खान गारद्याचे हेच ते अस्सल चित्र

पण हा इब्राहिमखान नेमका कुठला?

इब्राहिमखान गारद्याचे अस्सल चित्र औरंगाबाद महापालिकेच्या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयात ठेवलेले आहे. हलकी मेहंदी रंगाची छटा असलेली चांगल्या आकाराची ही तसबीर आहे. ही तसबीर इथं कुठून आली? इब्राहिमखान गारदी कुठला होता? याची कहाणी भन्नाटच आहे. डॉ. पुरवारांनी माझ्या त्या मित्राला सांगितले होते, ''हैदराबादच्या निजामाच्या पदरी असलेल्या गारद्यांची वस्ती औरंगाबादजवळच्या गोदावरीच्या काठच्या काही गावांमध्ये होती. त्यापैकी इब्राहिमखान हा आपल्या जवळचाच, गंगापूर तालुक्यातल्या कायगावचा. गोदाकाठी राहणाऱ्या गारदी जमातीची मोट बांधून इब्राहिमखानाने १० हजार गारद्यांचे एक शिस्तबद्ध लष्कर तयार केले होते. इब्राहिमखानाचे हे छायाचित्र मला कायगावच्याच एक दर्ग्यात मिळाले होते.''

या जिल्ह्यातील खंडोबा यात्रेला 66 वर्षांची परंपरा

Image result for कायगाव टोका
कायगाव टोका येथील सिद्धेश्वर मंदिर

औरंगाबाद-पुणे मार्गावर हे गाव कायगाव टोका म्हणून प्रसिद्ध आहे. इथे पेशव्यांनी बांधलेले सिद्धेश्वराचे भव्य मंदिरही आहे. इथल्याच गोदावरी नदीवरील पुलाने मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राशी जोडला गेला आहे. इतिहासकारांच्या दृष्टीने पुरवारांनी सांगितलेला दाखला ऐतिहासिक दस्तावेजांतून पडताळून अधिक अभ्यास करता येईल. पण देशासाठी जीव देणारा हा महापराक्रमी गारदी आपल्या जिल्ह्यातला होता, याचा अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Native Place of Ibrahim Khan Gardi was Near Aurangabad