निसर्गप्रेमींनी अनुभवला पक्षी निरीक्षणाचा आनंद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - तिबेट, रशिया, सायबेरिया, दक्षिण आफ्रिका, इराण, अमेरिका अशा देशांसह हिमालय पर्वत आणि भारताच्या विविध भागांतून आलेले स्थलांतरित पक्षी पाहण्याचा आनंद रविवारी (ता. 13) सुखना धरणावर पक्षीप्रेमींनी लुटला; तसेच प्रत्येक पक्ष्याचे वैशिष्ट्यदेखील यानिमित्ताने त्यांना अभ्यासकांनी समजावून सांगितले. 

औरंगाबाद - तिबेट, रशिया, सायबेरिया, दक्षिण आफ्रिका, इराण, अमेरिका अशा देशांसह हिमालय पर्वत आणि भारताच्या विविध भागांतून आलेले स्थलांतरित पक्षी पाहण्याचा आनंद रविवारी (ता. 13) सुखना धरणावर पक्षीप्रेमींनी लुटला; तसेच प्रत्येक पक्ष्याचे वैशिष्ट्यदेखील यानिमित्ताने त्यांना अभ्यासकांनी समजावून सांगितले. 

पक्षीप्रेमी व अभ्यासक डॉ. सलीम अली यांच्या जयंतीचे औचित्य साधून निसर्ग मित्रमंडळ व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) यांनी पक्षीगणना व पक्षी अभ्यासवर्ग राबविला. यात निसर्ग मित्रमंडळाचे पक्षीमित्र किशोर गठडी, केदार चौधरी, आदिनाथ भाले, रामेश्वर दुसाने, लालासाहेब चौधरी आदींनी निसर्गप्रेमींना मार्गदर्शन केले. पक्षी निरीक्षक, हौशी नागरिक, लहान मुले हा निसर्गाचा अनमोल खजिना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. 

नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत परिसरातील विविध ठिकाणच्या पाणवठ्यांवर परदेशी पक्षी आढळतात. परिसरातील जैवविविधता, खाद्य यांमुळे वर्षानुवर्षे हे स्थलांतरित पक्षी परिसरात वास्तव्यास असतात. या वेळी भारतीय पाणकावळा, रोहित, भारद्वाज, व्हाईट ब्रेस्टेड वॉटर हेन, जांभळी कोंबडी, कूट, इंडियन शंग, स्नोबर्ड, ब्लॅक विंग स्टिल्ट, सॅंडपाईपर, नदी सुरय, शिकरा, वेडा राघू, नीलपंख, कोतवाल, खाटिक, पर्पल सनबर्ड, सुगरण, लालबुडी बुलबुल, सातभाई, गुलाबी मैना, ऑस्प्रे, मार्श हॅरिअर, पेरिग्रीन फाल्कन, काईट, पेंटेड स्टार्क, व्हाईट नेक स्टार्क, स्पूनबिल, व्हाईट आयबीज, ब्लॅक आयबीज, ग्लॉसी आयबीज, शॉवलर, कॉमन टिल, स्पॉटबिल डक, सेंड पायपर, पर्पल मुरहेन, कॉमन कूट, पर्पल हेरॉन, ग्रे हेरॉन, किंगफिशर, ग्रे श्राईक, लार्क आदी पक्षी बघावयास मिळाले. 
या पक्षी निरीक्षणात वर्षा जोशी, कौस्तुभ जोशी, सुनील जोशी, चेतना जोशी, स्नेहा जोशी, संजय धाबेकर, माधवी धाबेकर, तेजल धाबेकर, अमोल दुसाने, नेहा दुसाने, मोहन शिखरे, शिवम शिखरे, यशवंत चांदणे, सुभाष चांदणे, संतोष बक्षी, स्वरा बक्षी, दिनेश दिकेकर, पंकज लभाने, सत्यशीला आव्हाड, अतुल नलावडे, पौर्णिमा नलावडे, अंबिका टाकळकर, निधेया टाकळकर, संतोष महेंद्रकर आदी पक्षीप्रेमी सहभागी झाले होते. 

यंदा चांगला पाऊस झाल्याने तलाव, पाणवठे अशा ठिकाणी पाणी आहे. त्यामुळे पाहुण्या पक्ष्यांच्या खाद्याची सोय झालेली आहे. काही दिवसांसाठी का होईना, मुक्‍कामी थांबणाऱ्या परदेशी पाहुण्यांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. फेब्रुवारीपर्यंत स्थानिक आणि स्थलांतरित पक्षी अभ्यासवर्ग घेतले जाणार आहेत. याच काळात नांदूर-मधमेश्‍वर, ढेकू तलाव (वैजापूर), भिगवण, जायकवाडी, सलीम अली सरोवर, हिमायतबाग येथेही पक्षी निरीक्षण करण्यात येणार आहे. 
- किशोर गठडी, अध्यक्ष, निसर्ग मित्रमंडळ, औरंगाबाद.

Web Title: Nature lovers experienced the joy of bird observation