महावितरणच्या "नवप्रकाश' योजनेला जुलैपर्यंत मुदतवाढ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

लातूर - थकीत वीजदेयकांमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या सार्वजनिक नळयोजना ग्राहक वगळून इतर सर्व उच्च व लघुदाब वीजग्राहकांच्या थकबाकी मुक्तीसाठी सुरू असलेल्या "नवप्रकाश' योजनेला येत्या ता. 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

लातूर - थकीत वीजदेयकांमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या सार्वजनिक नळयोजना ग्राहक वगळून इतर सर्व उच्च व लघुदाब वीजग्राहकांच्या थकबाकी मुक्तीसाठी सुरू असलेल्या "नवप्रकाश' योजनेला येत्या ता. 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

मुदतवाढ मिळालेल्या "नवप्रकाश' योजनेनुसार आता ता. 30 एप्रिलपर्यंत मूळ थकबाकीचा भरणा केल्यास 100 टक्के व्याज व विलंब आकाराची रक्कम माफ होणार आहे. तसेच ता. एक मे ते 31 जुलै या कालावधीत मूळ थकबाकीसह व्याजाची 25 टक्के रक्कम भरल्यास उर्वरित 75 टक्के व्याज व 100 टक्के विलंब आकाराची रक्कम माफ होणार आहे. या योजनेत ता. 31 मार्च 2016 पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या कृषीपंपधारक, घरगुती, वाणिज्य व औद्योगिक, तसेच इतर वर्गवारीतील (सार्वजनिक नळयोजना ग्राहक वगळता) वीजग्राहकांचा समावेश करण्यात आला आहे. लोकअदालत किंवा न्यायप्रविष्ट थकबाकीच्या प्रकरणातील थकबाकीदारांना यात सहभागी होता येणार आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणात हुकूमनामा (डिक्री) मंजूर होऊन 12 वर्षांपेक्षा अधिक झाली असल्यास अशा ग्राहकांनाही योजनेत सहभागी होता येईल. मूळ थकबाकीच्या रकमेचा भरणा करण्यासाठी महावितरणच्या संकेतस्थळावर "ऑनलाईन' सोय असून, संबंधित ग्राहकांच्या थकीत देयकांची व किती रक्कम भरायची याबाबत माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. या योजनेत थकबाकीमुक्त झालेल्या ग्राहकांना मागणीनुसार नवीन वीजजोडणी देण्यात येत आहे. त्यासाठी सुरक्षा ठेव, सर्व्हिस कनेक्‍शन चार्जेस, रिकनेक्‍शन चार्जेसमधून सूट देण्यात आली आहे. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या थकबाकीदार ग्राहकांनी नवप्रकाश योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

Web Title: Nav prakash scheme extended

टॅग्स