#NavDurga सावित्रीच्या लेकीचा शिक्षणाचा वसा

Sangita-Khillare
Sangita-Khillare

कळत्या वयापूर्वीच तिचे लग्न झाले. दहावी नापास पती एका कंपनीत सुरक्षारक्षक; तर ती शिलाई मशीन चालवून संसाराचा गाडा हाकण्यासाठी त्याला मदत करीत होती. अशातच शिक्षणाची आवड असलेल्या पतीने प्रोत्साहन दिले. तीही दहावी उत्तीर्ण झाली. नंतर परिसरातील शाळाबाह्य मुलांना शिकवण्याचे काम सुरू केले. एवढेच नाही, तर त्यांचे प्रश्‍न कायमचेच सोडविण्यासाठी तिने शाळाही सुरू केली. या काळात तिने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. ही प्रेरणावाट आहे ती संगीता गोविंदराव खिल्लारे यांची.

दहावीला असतानाच संगीता यांचे १९८७ ला लग्न झाले. पती प्रकाश सोनवणे एका कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होते. शिक्षणाची प्रचंड इच्छा असलेल्या संगीता यांनी लग्नानंतर दहावी उत्तीर्ण केली. पुढे आयटीआयमधून शिलाई कामात प्रावीण्य मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. यामुळे महापालिकेकडून त्यांना शिलाई मशीन भेट मिळाली. त्यानंतर संगीता या आंबेडकरनगर येथे महिलांसाठी शिवणक्‍लास घेऊ लागल्या. शासनाच्या सार्थक महिला मंडळाअंतर्गत २५ रुपये प्रतिमहिना मानधनावर शाळाबाह्य मुलांना शिकवण्याचे कामही त्यांनी सुरू केले. त्यावेळी मुलांच्या, पालकांच्या व्यथा जाणून घेतल्या. केवळ फी भरण्यासाठी पैसे नसल्याने या मुलांना शिक्षण घेता येत नसल्याने त्या अस्वस्थ झाल्या. या मुलांनाही शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा त्यांनी निश्‍चय केला. यासाठी वर्ष १९९० मध्ये ज्ञानसंदीप शिक्षण संस्थेचा प्रस्ताव मंत्रालयात दाखल केला. पाच वेळा तो फेटाळण्यात आला. वर्ष १९९८ ला उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कायम विनाअनुदानित शाळेला मान्यता दिली. त्यानंतरही संघर्ष सुरूच होता. शाळेचे क्षेत्र आंबेडकरनगर. मुलांकडे वह्या, पुस्तके, फीसाठी पैसे नसत. संगीता यांनी स्वखर्चाने वह्या पुस्तके देत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. याबरोबरच स्वतः तीन मुलांना उच्चशिक्षण दिले. सध्या त्यांची तीनही मुलं व सून ज्ञानदानाचे काम करीत आहेत. संस्थेच्या आंबेडकरनगर व मिसारवाडी या भागात शाळा आहेत. 

पतीनेही पूर्ण केली पदवी
शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हा मंत्र महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. त्या आधारे शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेत मी आणि माझ्या पतीने लग्नानंतर पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर शाळा सुरू करून शालेय व्यवस्थापनासाठी लागणारी डीएसएमची पदवी प्राप्त केली. आता आमच्या शाळेत दहावीपर्यंतचे वर्ग आहेत, असे संगीता खिल्लारे-सोनवणे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com