घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

आनंदाला उधाण; लातूर जिल्ह्यातील 487 मंडळांत देवीची स्थापना 

लातूर : देवीच्या मूर्तीवर तोफेतून होणारी फुलांची उधळण... फटाक्‍यांची आतषबाजी... आसमंतात घुमणारा ढोल-ताशांचा आवाज... लक्ष वेधून घेणारी बॅंडची सुरावट... हवेत उंच फडकणारा भगवा ध्वज... तरुणाईचा सळसळता उत्साह... अशा वातावरणात मिरवणुका काढत शहरातील मंडळांनी देवीची आराधना केली. अशा लक्षवेधी मिरवणुका काढत जिल्ह्यात 487 मंडळांत देवीची स्थापना करण्यात आली. 

घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला रविवारी (ता. 29) प्रारंभ झाला. गेल्या आठवडाभरापासून घराघरांत या उत्सवाची तयारी सुरू होती. बाजारपेठही वेगवेगळ्या वस्तूंनी सजली होती. तेच चित्र आजही बाजारात पाहायला मिळाले. फुलांचे तोरण, दारासमोर आकर्षक रांगोळ्या काढून अनेकांनी आपल्या घरात घटस्थापना केली.

शहरातील आणि जिल्हाभरातील मंडळांतही असेच उत्साहाचे चित्र होते. अश्वरथात देवीच्या मूर्तीची मिरवणूक काढली जात होती. त्यासमोर ढोल-ताशांचा दणदणाट, तर काहींनी बॅंडच्या सुरेल सुरावटीत मिरवणुका काढून लक्ष वेधून घेतले. सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील 235 मंडळांत देवीची स्थापना करण्यात आली होती. मंडळाच्या रात्री उशिरापर्यंत वाजत-गाजत मिरवणुका सुरू होत्या. 

गंजगोलाई येथील श्री जय जगदंबा नवरात्र महोत्सव मंडळाच्या देवीची मिरवणूक काढून दुपारी घटस्थापना करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष शिवशंकर बिडवे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. याप्रसंगी मंडळाचे ज्येष्ठ विश्‍वस्त माजी आमदार वैजनाथ शिंदे, उपाध्यक्ष सुभाषप्पा हत्ते, शिवशंकरप्पा पारशेट्टी, सचिव बसवंत भरडे, प्रा. के. एस. वारद, सहसचिव राजेश्‍वर डांगे, कोषाध्यक्ष शिवप्पा अंकलकोटे, मंडळाचे विश्‍वस्त सिद्रामप्पा औरादे, वीरभद्र वाले, गंगाधर हामणे उपस्थित होते. 

दुष्काळ हटू दे 
राज्यात जवळजवळ सर्वच ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे; पण लातूर जिल्ह्यात अद्याप पुरेसा पाऊस झाला नाही. शहराला पाणीपुरवठा करणारे धरण कोरडे पडले आहे. पिकेसुद्धा संकटात सापडली आहेत. म्हणून लातूरकरांचे लक्ष आभाळाकडे लागले आहे. त्यामुळे देवीसमोर परतीचा पाऊस पडू दे, दुष्काळ हटू दे, समृद्धी येऊ दे, अशी प्रार्थना केली जात होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: navratri festival starts with Ghatsthapna