जिल्हापरिषद व पंचायतीसाठी राष्ट्रवादीचे 'आस्ते कदम'

Sunil Tatkare
Sunil Tatkare

औरंगाबाद : नगरपालिका निवडणुकीतील पराभवाचे पडसाद कॉंग्रेसप्रमाणेच राष्ट्रवादीतही उमटले. कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांचा राजीनाम्यावर प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी मोहर उठवली नसली तरी शहराध्यक्ष नामदेव पवार यांच्याकडे कार्यभार सोपवून सत्तार यांना द्यायचा तो मेसेज दिला. कॉंग्रेसच्या तुलनेत नगरपालिका निवडणुकीत जास्त नुकसान झालेल्या राष्ट्रवादीने मात्र सबुरीने घेण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब चिकटगांवकर यांचा राजीनामा फेटाळत प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी जिल्हा परिषदेची जबाबदारी देखील त्यांच्याच खांद्यावर टाकली आहे. 


कॉंग्रेसमधील राजीनाम्याचे लोण राष्ट्रवादीत पोचल्याने जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांनी पक्षाच्या दारुण पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत मागणी होण्याआधीच जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे पाठवून दिला होता. त्यांच्या या प्रामाणिकपणाची दखल घेत पक्षाने पराभवाची जबाबदारी सामूहिक असल्याचे सांगत चिकटगांवकरांना अभय दिले. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाला कुठल्याही चुकीचा फटका बसेल असा निर्णय न घेण्याचे पक्षनेतृत्वाने ठरवल्याचे यावरुन स्पष्ट होते. कामाला लागा असा निरोप मिळाल्याने चिकटगांवकर जोमाने कामाला लागले आहेत. 


इच्छुकांचे स्वप्न भंगले 
नगरपालिका निवडणुकीची नैतिक जबाबदारी स्वीकारत जिल्हाध्यक्ष चिकटगांवकर यांनी स्वतःहून राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या विरोधकांमधून आनंदाची प्रतिक्रिया उमटली होती. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदासाठी संजय वाघचौरे, सुधाकर सोनवणे यांच्यासह अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून होते. पण प्रदेशाध्यक्षांनी चिकटगांवकरांचा राजीनामा फेटाळल्याने त्यांचे स्वप्न भंगले. 


सतीश चव्हाण यांची फाईल थंड बस्त्यात 
पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या विरोधात माजी आमदार संजय वाघचौरे, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष कदीर मौलाना, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष अभिषेक देशमुख यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी गंभीर आरोप करत त्यांना लगाम घालण्याची मागणी प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्याकडे केली होती. ठेकेदार असलेले चव्हाण हे राष्ट्रवादी संपवायला निघाले आहेत, वरिष्ठांचे कान भरणे हाच त्यांचा उद्योग आणि विरोधकांशी हातमिळवणी करून आपल्याच पक्षाचे उमेदवार पाडण्याचे काम त्यांनी केल्याचा बॉम्बगोळा या मंडळीनी टाकला होता.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय व अंत्यत विश्‍वासू समजल्या जाणाऱ्या आमदार सतीश चव्हाण यांच्यावरच गंभीर आरोप झाल्यावर यामागे पक्षातील अन्य मोठ्या नेत्यांचाच हात असल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात सुरू होती. त्याला आणखी बळ मिळू नये याची काळजी घेत आरोपांच्या फैरी झाडून तीन आठवडे उलटल्यानंतरही या प्रकरणावर प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी कुठलीच भूमिका किंवा प्रतिक्रिया दिलेली नाही. यावरून सध्या तरी ही फाईल मागे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अनुमान काढण्यात येत आहे. या घडामोडी आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील दुफळी पाहता जिल्हा परिषदेची सत्ता आघाडी कायम कशी राखणार हा खरा प्रश्‍न आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com