सर्वपक्षीयांच्या पाठिंब्याने राष्ट्रवादीचा झेंडा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

परभणी - परभणी जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीने सर्वपक्षीय पाठिंब्याच्या जोरावर सत्ता स्थापन केली आहे. अध्यक्षपदी उज्ज्वला राठोड, तर उपाध्यक्षपदी भावना नखाते यांची बिनविरोध निवड झाली. दोन्ही पदे राष्ट्रवादीकडेच आहेत. कॉंग्रेस, रासप आणि भाजपने सपशेल लोटांगण घेत राष्ट्रवादीला बिनशर्त पाठिंबा दिल्याने सर्वच अवाक्‌ झाले. 

जिल्हा परिषदेत 54 जागांपैकी 24 जागा जिंकून राष्ट्रवादीने सत्तास्थापनेसाठी दावा केला होता; मात्र त्यांना चार सदस्यांच्या पाठिंब्याची गरज होती. त्यामुळे नेमका कुणाचा पाठिंबा घेणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून तर्क-वितर्क लावले जात होते. कॉंग्रेससोबत आघाडी करण्याच्या सूचना राज्यपातळीवरून आल्याने राष्ट्रवादीने एक सभापतिपद देण्याची तयारी दर्शविली होती; मात्र कॉंग्रेसचा पाठिंबा नको, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या स्थानिकांनी घेतल्याने मोठ पेच निर्माण झाला होता. रासप आणि भाजप सुरवातीपासून सत्तेत सहभागी होण्यास इच्छुक होते. अखेर रासपच्या तीन आणि तीन अपक्षांनी राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे काही वेळातच भाजपच्या पाच आणि कॉंग्रेसच्या सर्व सहा सदस्यांनी पाठिंबा देत आपला उमेदवार उभा केला नाही. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या उज्ज्वला राठोड, उपाध्यक्षपदासाठी भावना नखाते यांचेच एकमेव अर्ज आल्याने पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी त्यांना विजयी घोषित केले. निवडीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत या संदर्भात माहिती जाहीर केली. 

Web Title: NCP banner with the support of all