Vidhan Sabha 2019 : राष्ट्रवादीला मोठा धक्का; पवारांनी उमेदवारी जाहीर केली; पण...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

- उमेदवारी राष्ट्रवादीने जाहीर केली पण नमिता मुंदडा लढणार कोणाकडून
- चार दिवसांपूर्वी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नमिता मुंदडा यांची केजमधून उमेदवारी जाहीर केली होती.

केज (बीड) : खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केजमधून राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर केलेल्या नमिता अक्षय मुंदडा या राष्ट्रवादीतूनच निवडणुक लढणार आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांनी मतदारांना आशिर्वाद मागणाऱ्या पोस्ट तर केल्या आहेत, परंतु यावर ना पक्षाचे चिन्ह आहे ना पवारांचे. त्यामुळे जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे. 

दिवंगत लोकनेत्या डॉ. विमल मुंदडा यांच्या स्नुषा असलेल्या नमिता मुंदडा मागच्या वेळी केज मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढल्या होत्या. मोदी लाट आणि दिवंगत मुंडेंची सहानुभूती त्यावेळी भाजपची जमेची बाजू तर होतीच. शिवाय मुंदडांच्या पराभवाला राष्ट्रवादीनेही मोठा हातभार लावला होता. त्यानंतरही पक्षांतर्गत गटबाजीवर कोणताही उपाय शोधला नव्हता.

Image may contain: 2 people, people smiling, text

दरम्यान, मागच्या आठवड्यात जिल्हा दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पाच उमेदवार जाहीर केले. यात केजमधून नमिता मुंदडा यांचा समावेश होता. परंतु, त्यानंतर त्यांच्यासह पती अक्षय मुंदडा व सासरे नंदकिशोर मुंदडा यांच्या फेसबुक पोस्टवरील आवाहने पाहीली तर त्यांना राष्ट्रवादीकडून निवडणुक लढवायची आहे का, अशी शंका येते.

दिवंगत लोकनेत्या डॉ. विमल मुंदडा यांनी मतदार संघात केलेल्या विकास कामांचा उहापोह करुन ‘येत्या विधानसभेला मी उभारणार आहे आपला आशिर्वाद असावा’ असे आवाहन केले आहे. परंतु, अशा आवाहन करणाऱ्या कुठल्याच पोस्टवर पक्षाचे चिन्ह वा पवारांचा फोटो नाही. दरम्यान, दिवंगत लोकनेत्या डॉ. विमल मुंदडा यांनी सलग पाच वेळा केज मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांची राजकीय सुरुवातही भाजपमध्ये होऊन त्यांनी दोन वेळा भाजपच्या चिन्हावर विधानसभेत विजय मिळविला होता. त्यामुळे भुतकाळातले ऋणानुबंध आणि वर्तमानातील या पोस्टचा काही संबंध जुळतो का, याचाही राजकीय जानकार विचार करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp candidate namita mundada facebook post get viral