नव्या पिढीला नेतृत्वाची संधी देणार : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

राष्‍ट्रवादी कॉँग्रेस आता नव्या दमाच्या, नव्या पिढीच्या हातात नेतृत्व देऊन देशाला वाचविण्याचे काम करणार आहे. शेवटच्या श्‍वासापर्यंत तरुणांना साथ देण्याचे काम करु, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

नांदेड  : ‘आजपर्यंत सात वेळा विधानसभा तर सात वेळा
लोकसभेत निवडून गेलो. आता यापुढे काहीही नको. आज देशाची सामाजिक, आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. शेतीवर आधारित असलेल्या घटक नागवला जात आहे.
बेरोजगारांच्या हाताला काम नाही. सत्ताधारी लोकांना या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. आम्ही मात्र आता या स्थितीकडे पाहत बसणार नाही. राष्‍ट्रवादी कॉँग्रेस आता नव्या दमाच्या, नव्या पिढीच्या हातात नेतृत्व देऊन देशाला वाचविण्याचे काम करणार आहे. शेवटच्या श्‍वासापर्यंत तरुणांना साथ देण्याचे काम करु, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

नांदेड येथे गुरुवारी (ता. १९) सकाळी साडेनऊ वाजता शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे, माजी मंत्री कमलकिशोर कदम, गंगाधरराव कुंटूरकर, आमदार प्रदीप नाईक, माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, नागनाथराव रावणगावकर, प्रदेश उपाध्यक्ष महम्मद खान पठाण, राष्ट्रवादी महिला ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षा
प्रांजली रावणगावकर, शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना पवार म्हणाले, ‘सध्या बाजारातील मंदीमुळे बेरोजगारी वाढली आहे. हजारो लोकांचा रोजगार गेला. शेकडो कारखाने बंद पडत आहेत. यामुळे तरुणांचा हाताला काम नाहीत. नाशिकमधील ५४ कारखाने बंद पडून १६ हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या. मराठवाड्यातील तरुण रोजगाराच्या शोधात
आहेत. यामुळे त्यांची लग्न जमेनाशी झाली आहेत. माझ्या काळात औरंगाबादला बजाजला कारखाना सुरु करण्यास भाग पाडले. या भागात कारखानदारी उभी झाली. दुष्काळी भागातील हजारो तरूणांच्या हाताला काम मिळाले. मुंबईतील १२० पैकी
११० कापड गिरण्याबंद पडल्या. यामुळे लाखो लोक बेरोजगार झाले. 

या ठिकाणी बाहेरचे लोक आले. सध्या प्रचंड मंदीचा काळ आहे. गुंतवणूक येत नाही. शेतीक्षेत्र धोक्यात आहे. या सरकारने त्यांच्या काळात किती कारखाने बंद पडले त्याची आकडेवारी द्यावी. त्यांनी पाच वर्षात काय दिवे लावले हे सांगण्यापेक्षा काम काय केले हे सांगावे’, असा टोला त्यांनी सरकारला
लगावला. यापुढे राज्यातील गरीबी, बेरोजगारी, जातीयवाद, शेतकरी आत्महत्या आदी प्रश्‍न मिटवून राज्याची प्रगती करण्यासाठी काम करायचे आहे, असे वक्तव्या त्यांनी शेवटी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP chief Sharad Pawar selects youth candidates for Maharashtra Vidhan Sabha 2019 election