मनाला हुरहूर लावणारा पराभव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

उस्मानाबाद - पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवकपदाचे चार उमेदवार अवघ्या एक किंवा दोन मतांनी पराभूत झाले आहेत. निवडणूक म्हटले की जय-पराजय आलाच; परंतु केवळ एक, दोन मतांनी झालेला पराभव मनाला हुरहूर लावून जातो.

उस्मानाबाद - पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवकपदाचे चार उमेदवार अवघ्या एक किंवा दोन मतांनी पराभूत झाले आहेत. निवडणूक म्हटले की जय-पराजय आलाच; परंतु केवळ एक, दोन मतांनी झालेला पराभव मनाला हुरहूर लावून जातो.

पालिका निवडणुकीमुळे गेल्या पंधरा दिवसांत सुरू असलेल्या प्रचार रणधुमाळीने वातावरण चांगलेच तापले होते. विजयी पताका रोवण्यासाठी प्रत्येकाने जिवाचे रान केले. निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. बहुतांश उमेदवार मोठ्या मताधिक्‍क्‍याने पराभूत झाले. तर चार उमेदवारांना अवघ्या एक किंवा दोन मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले. मनाला हुरहूर लावणाऱ्या पराभवामुळे कोठे कमी पडलो याचे आत्मपरीक्षण सुरू होते. शहरातील प्रभाग पाच "अ' मध्ये राष्ट्रवादीच्या रेखा कावरे यांना 748 मते मिळाली. तर भाजपच्या राणी पवार यांना 749 मते मिळाली. या प्रभागात एकूण बारा टपाली मते होती. यातील चार मते नोटा, सहा श्रीमती पवार यांना मिळाली, तर श्रीमती कावरे यांना एकही मत मिळाले नाही. त्यामुळे कावरे यांना केवळ एका मताने परभाव पत्करावा लागला. प्रभाग क्रमांक आठ अ मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रोहन पांढरे, तर जिंकता जिंकता हरलो, असा अनुभव आला. शिवसेनेचे सिद्धेश्‍वर कोळी व श्री. पांढरे यांना समान 820 मते मिळाली. त्यामुळे दोघांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. यात सिद्धेश्‍वर कोळी निवडून आले.

प्रभाग तेरामध्ये मुस्लिम समाजाची मते जास्त आहेत. या प्रभागात राणाजगजितसिंह प्रतिष्ठानचे शहराध्यक्ष असणारे नीलेश पाटील यांच्या कुटुंबात उमेदवारी देण्याचे राष्ट्रवादीने टाळले. मुस्लिम व दलित वर्गातील अनेक उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे श्री. पाटील यांना निवडून येण्याचा विश्‍वास होता. तरीही पक्षाकडून त्यांना डावलण्यात आले. कॉंग्रेसमधून पक्षात आलेल्या मुनीर कुरेशी यांच्या कुटुंबातील उमेदवाराला राष्ट्रवादीकडून तिकीट मिळाले. या प्रभागात अपक्ष तेजाबाई पाटील यांनी एका मताने फरिदा कुरेशी यांचा पराभव केला. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत याचेही तिकीट कापले. त्यांनी बंडखोरी करीत 632 मते मिळविली. श्री. चिलवंत यांनाही विजयासाठी केवळ पाच मते कमी पडली. चारही उमेदवारांचा निसटता पराभव झाल्याने राष्ट्रवादीचे संख्याबळ घटले. योग्य उमेदवार निवडण्यात आलेल्या अपयशामुळे असे झाल्याची चर्चा सुरू आहे.

Web Title: NCP four candidates defeated in just two votes