बजरंग सोनवणे यांनी केली राष्ट्रवादीच्या गटाची नोंदणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

बीड - राष्ट्रवादीच्या २५ सदस्यांनी एका अपक्षाला सोबत घेऊन अखेर बुधवारी (ता. आठ) बीड जिल्हा परिषदेसाठी गटाची नोंदणी केली. जिल्हा परिषदेच्या सत्तेत राष्ट्रवादीसोबत असणारे काँग्रेसचे ३ सदस्य मात्र या गटात सहभागी झालेले नाहीत. राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून बजरंग सोनवणे यांनी हा ‘स्पेशल छब्बीस’ जणांचा गट नोंदविला आहे.

बीड - राष्ट्रवादीच्या २५ सदस्यांनी एका अपक्षाला सोबत घेऊन अखेर बुधवारी (ता. आठ) बीड जिल्हा परिषदेसाठी गटाची नोंदणी केली. जिल्हा परिषदेच्या सत्तेत राष्ट्रवादीसोबत असणारे काँग्रेसचे ३ सदस्य मात्र या गटात सहभागी झालेले नाहीत. राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून बजरंग सोनवणे यांनी हा ‘स्पेशल छब्बीस’ जणांचा गट नोंदविला आहे.

बीड जिल्हा परिषदेच्या सभागृहात सर्वाधिक २५ सदस्य असलेल्या राष्ट्रवादीकडून निकालाच्या दिवसापासूनच गटनोंदणीच्या हालचाली सुरू होत्या; मात्र विविध गटातटात विखुरलेल्या राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या एकत्रित स्वाक्षऱ्या मिळविण्यात उशीर झाल्याने गटाची नोंदणी पुढे ढकलली जात होती. त्यातच आष्टीतील अपक्ष सदस्य अश्विनी निंबाळकर यांच्या स्वाक्षरीसाठीही राष्ट्रवादीला प्रतीक्षा करावी लागली. याशिवाय काँग्रेसच्या ३ सदस्यांनी आम्ही तुमच्यासोबत आहोत, पण गटात येणार नाही, अशी भूमिका घेतली. यामुळे बुधवारी अखेर राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेले २५ आणि आष्टीतील अपक्ष अश्विनी निंबाळकर अशा २६ सदस्यांच्या गटाची नोंदणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या निर्देशानुसार गटनेते बजरंग सोनवणे यांनी केली.

या गटामध्ये आता बजरंग सोनवणे यांच्यासह अर्चना बोरकर, विजयसिंह पंडित, प्रकाश गवते, मंगला सोळंके, वनिता चव्हाण, कल्याण अबूज, चंद्रकांत शेजूळ, अनुसया साळुंके, वैशाली सावंत, मंगल डोईफोडे, शिवाजी पवार, प्रकाश कवठेकर, अश्विनी जरांगे, संगीता महारनवर, अश्विनी निंबाळकर, सारिका सोनवणे, जयसिंग सोळंके, भारती तिडके, अश्विनी किरवले, अजय मुंडे, रेखा आघाव, कौसाबाई फड, जयश्री शेप, शिवकन्या सिरसट, शंकर उबाळे यांचा समावेश आहे. या सर्वांनी सभागृहात गटनेता म्हणून बजरंग सोनवणे बजावतील त्या आदेशाचे पालन करण्याचे शपथपत्र लिहून दिले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीत सरळसरळ दोन गट पडले होते. त्यातून पक्षात फुटीचे चित्र निर्माण होऊ पाहत होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी झालेल्या गटनोंदणीला महत्व आहे.

अशोक लोढा शिवसंग्रामचे गटनेते 
शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषदेने जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या आपल्या ४ सदस्यांच्या गटाची नोंदणी बीड तालुका विकास आघाडी म्हणून केली आहे. यात गटनेतेपदी अशोक लोढा यांची निवड करण्यात आली असून जयश्री मस्के, विजयकांत मुंडे, भारत काळे यांचा या गटात समावेश आहे.

पंचायत समित्यांसाठीही गटनोंदणी
जिल्हा परिषदेसोबतच विविध पंचायत समित्यांसाठीही गटांची नोंदणी करण्यात आली आहे. बीड पंचायत समितीसाठी यापूर्वीच काकू-नाना आघाडीने एका अपक्षासह ७ सदस्यीय गट नोंदविला आहे, तर शिवसेना आणि शिवसंग्रामने एकत्रित ६ सदस्यीय गटाची नोंदणी केली होती. बुधवारी आष्टीत भाजपच्या ७ सदस्यीय गटाची नोंदणी अजिनाथ सानप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे, तर गेवराईत यापूर्वीच शिवसेना ६ आणि भाजपच्या ७ सदस्यांचा गट नोंदविण्यात आला आहे. आष्टीत राष्ट्रवादीने ७ सदस्यांचा गट नोंदविला आहे.

Web Title: ncp group registration by bajrang sonawane