आता मुख्यमंत्री दिल्लीत येता चर्चाही होत नाही : सुप्रिया सुळे 

Supriya Sule
Supriya Sule

औरंगाबाद - एकेकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येताच दिल्ली हादरायची, चर्चा रंगायची; मात्र आता दहा वेळा मुख्यमंत्री आले काय अन्‌ गेले काय, तरी साधी चर्चाही होत नाही, अशा शब्दांत "राष्ट्रवादी'च्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर येथे तोफ डागली. 

मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे सोमवारी (ता. 14) खासदार सुळे यांनी अल्पसंख्याक समाजातील शैक्षणिक, सामाजिक, डॉक्‍टर, वकील, इंजिनिअर्स आदी क्षेत्रांतील व्यक्तींशी संवाद साधला. या वेळी डॉ. काझी रिझवाना शमीम, इलियास किरवानी यांनी आपले मनोगत व्यक्‍त केले. आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, प्रदेश प्रवक्ते नीलेश राऊत, सिद्दिकी नईम सुलताना, डॉ. रशीद मदनी, तय्यब बुखारी, डॉ. निसार देशमुख, मुफ्ती जुनैद, खालेद सैफुद्दीन, शेख जहूर खालेद, आर. एस. मोगल उपस्थित होते. 

खासदार सुळे पुढे म्हणाल्या, की आगामी निवडणुका अन्न, वस्त्र आणि निवारा याविषयी आश्‍वासने देत होतील. मात्र, त्यानंतरच्या 2024 च्या निवडणुकीत सुशिक्षित बेरोजगार हाच मुख्य मुद्दा असेल. 

जीएसटी, नोटाबंदीपेक्षा निरव मोदींसारख्यांच्या मालमत्तेवर छापे टाकले असते तर मोठ्या प्रमाणात पैसा हाती लागला असता. या सरकारची नियत चांगली असती तर संसदेत महिलांना 50 टक्‍के आरक्षण दिले असते, अशी टीकाही त्यांनी केली. दरम्यान, ट्रिपल तलाकविषयी संसदेत मांडलेल्या प्रखर भूमिकेबद्दल रोशनगेट येथे महाराष्ट्र मुस्लिम अवामी कमिटीतर्फे त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. 

सत्ता गेली; पण इतिहास घडविला 
मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिल्यानंतर सत्तांतर झालेले असले, तरी या निर्णयामुळे इतिहास घडला असल्याचे खासदार सुळे यांनी या वेळी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com