गैरव्यवहारप्रकरणी कदम पोलिसांच्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

उस्मानाबाद - अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील जवळपास वीस लाख रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने बुधवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निलंबित आमदार तथा अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम यांना ताब्यात घेतले. दुपारी तीनच्या सुमारास त्यांना आनंदनगर पोलिस ठाण्यातून जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयासमोर उभे केल्यानंतर न्यायाधीशांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व त्यांना एका दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. उद्या (ता. 14) पुन्हा रमेश कदम यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

रमेश कदम यांच्यावर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळांतर्गत बोगस लाभार्थी दाखवून राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले जात आहे. ठाणे येथील कारागृहातून रमेश कदम यांना येथील आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. काल (ता. 12) मध्यरात्रीनंतर त्यांना ताब्यात घेऊन उस्मानाबादच्या आनंदनगर पोलिस ठाण्यात आणण्यात आले.

न्यायालयात वकिलांच्या ऐवजी स्वतः रमेश कदम यांनी आपली बाजू मांडली. त्यावेळी या प्रकरणात आपला कसलाही सहभाग नसल्याचे सांगून केलेल्या आरोपाची सत्यता पडताळून पाहावी, अशी विनंती त्यांनी कोर्टासमोर केली. न्यायालयाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेत रमेश कदम यांना एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

Web Title: NCP Ramesh Kadam police arrested crime