वाशीत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत राकाँची उडी

नेताजी नलवडे
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

शिवशक्ती शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी काँग्रेस व भाजपामध्ये दुरंगी लढत होत आहे. यामध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता नागरीकांना लागली आहे.

वाशी - येथील शिवशक्ती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असुन या निवडणुकीत काँग्रेसच्या शिवशक्ती शेतकरी विकास आघाडीला राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर पाठींबा दिला आहे.

पाठींब्याचे पत्र आ. राहुल मोटे यांनी मंगळवार (ता. 28) ला दिले आहे. त्यामुळे शिवशक्ती शेतकरी विकास आघाडीचे पारडे जड झाल्याचे मानले जात आहे. येथील शिवशक्ती शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी काँग्रेस व भाजपामध्ये दुरंगी लढत होत आहे. यामध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता नागरीकांना लागली आहे.

या निवडणुकीत जिल्हा काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष प्रशांत चेडे व आ. सुजितसिंह ठाकुर यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. 2 सप्टेंबर ला होणाऱ्या या निवडणुकीसाठी कारखान्याचे एकुण जवळपास 3650 सभासद मतदानाचा हक्क बजावुन पुढील 5 वर्षासाठी कारखान्याचे कारभारी निवडणार आहेत.

सोसायटी मतदार संघातून कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष पंडितराव (आबा) चेडे यांचा एकमेव अर्ज आल्याने ते बिनविरोध निवडून आलेले आहेत. तर दुसरीकडे उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेमध्ये काँग्रेस उमेदवाराचा एक अर्ज बाद झालेला असल्याने भाजपाच्या एका उमेदवाराचा या कारखान्याचा संचालक म्हणुन कारखान्यात प्रवेश निश्चित झालेला आहे.

या कारखान्याच्या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने आपले उमेदवार उभे केलेले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्या भुमिकेकडे मतदारांचे लक्ष लागले होते. मंगळवारी आ. राहुल मोटे यांनी काँग्रेसच्या शिवशक्ती शेतकरी विकास आघाडीला पाठिंबा दिला असल्याने शिवशक्ती शेतकरी विकास आघाडीला विजयासाठी, मोठा फायदा होणार असल्याची चर्चा आहे.

Web Title: NCP supports to congress in election of cooperation sugar factory in vaashi