उस्मानाबादेत राष्ट्रवादी काँग्रेसचे महागाईच्या निषेधार्थ आंदोलन

राजेंद्रकुमार जाधव
सोमवार, 4 जून 2018

पिठले- भाकरीचा स्वयंपाक करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर महिलांनी चुली मांडल्या होत्या.

उस्मानाबाद - पेट्रोल, डिझेल दरवाढ आणि वाढत्या महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने सोमवारी (ता. 4) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवर स्वयंपाक करून आंदोलन करण्यात आले.

लोकसभेच्या 2014 मधील सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान भारतीय जनता पक्षाने देशातील जनतेला महागाई कमी करण्याचे दाखविलेले स्वप्न आज धुळीस मिळाले असल्याचा आरोप करीत या महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरर चुलीवर स्वयंपाक करून आंदोलन करण्यात आले.

पिठले- भाकरीचा स्वयंपाक करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर महिलांनी चुली मांडल्या होत्या. पेट्रोल व डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. गॅस सिलेंडरची किंमतही वाढली आहे. रेशन दुकानात केशरी कार्डधारकांना मिळणारे रेशन सध्या अनेकांसाठी बंद करण्यात आले आहे व महागाईच्या या दिवसात दुकानामध्ये देय मालही सहजासहजी उपलब्ध होत नसल्याचा आरोप महिलांनी केला. पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे पाल्यांच्या स्कूल बस व रिक्षाचा खर्चही 30 टक्क्यांनी वाढणार आहे.

आज सर्वच स्तरावर होत असलेल्या दरवाढीमुळे जनता हैराण झाली असून, याची सर्वाधिक झळ महिलांना सोसावी लागत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वयंपाक करुन वाढत्या महागाईचा व इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. रणरणत्या उन्हात बसून महिलांनी हे आंदोलन केले. वाढत्या महागाईमुळे भाजप- शिवसेना सरकारचा यावेळी महिलांकडून निषेध करण्यात आला.

Web Title: NCPs agitation against the inflation in osmanabad