परळीत धनंजय मुंडेंचा आणखी एक विजय; पंकजांचा पराभव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

गेल्या तीस वर्षांपासून परळी बाजार समिती स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्याच ताब्यात होती. गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे मोठे बंधू पंडितअण्णा मुंडे हेच या बाजार समितीचा कारभार बघायचे.

परळी (बीड) - विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या परळी बाजार समिती निवडणुकीत धनंजय मुंडेंनी बाजी मारली आहे. राष्ट्रवादीने 18 पैकी 14 जागा जिंकत भाजपचा दारुण पराभव केला आहे. भाजपला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे.

गेल्या तीस वर्षांपासून परळी बाजार समिती स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्याच ताब्यात होती. गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे मोठे बंधू पंडितअण्णा मुंडे हेच या बाजार समितीचा कारभार बघायचे.

पंडित अण्णांनी बंडखोरी केल्यानंतर या बाजार समितीवर धनंजय मुंडेंनी एक हाती अंमल ठेवला. आता गोपीनाथ मुंडे आणि पंडितअण्णा हयात नाहीत. त्यांच्या पश्चात होणाऱ्या या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी आपल्या पॅनलला गोपीनाथ मुंडे यांचे नाव दिले आहे, तर धनंजय यांनी आपल्या पॅनलला पंडितअण्णा यांचे नाव दिले आहे.

परळी नगरपालिका ताब्यात ठेवण्यात धनंजय मुंडेंना यश मिळाल्यानंतर धनंजय मुंडेंच्या राजकीय महत्वाकांक्षा वाढल्या आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही पंकजा मुंडेंचा मोठा पराभव धनंजय मुंडेंनी केला होता.

Web Title: NCP's wins at Parli market committee, BJP defeat