जलपर्णीमुळे रक्तपिपासू डासांच्या उत्पतीत वाढ 

संकेत कुलकर्णी 
रविवार, 9 डिसेंबर 2018

समृद्ध जैवविविधता असलेल्या शहरातील एकमेव पाणथळीवर वाढलेली ही वनस्पती पक्ष्यांसाठी चांगला निवारा आहे, असे काही पक्षीमित्र म्हणत असले, तरी डासांच्या अळ्या आणि विषाणूंसाठी हे पाणी आणि जलपर्णी वरदान ठरत आहे. सरोवरात येणाऱ्या ड्रेनेजच्या पाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणाच बंद असल्यामुळे या घाणेरड्या पाण्यात नायट्रोजन, फॉस्फरस अशी पोषकद्रव्ये ठासून भरलेली आहेत. 

औरंगाबाद : घरात डासांच्या अळ्या होऊन आजार पसरू नयेत, म्हणून महापालिका एकीकडे गल्लोगल्ली धूरफवारणी करते; पण दुसरीकडे सलीम अली सरोवरात रक्तपिपासू डासांच्या अब्जावधी अळ्या नांदत आहेत. डास आणि विषाणूंना मिळालेला खास आवडीचा निवारा म्हणजे तलावावर पडलेले जलपर्णीचे पांघरूण. समृद्ध जैवविविधता असलेल्या शहरातील एकमेव पाणथळीवर वाढलेली ही वनस्पती पक्ष्यांसाठी चांगला निवारा आहे, असे काही पक्षीमित्र म्हणत असले, तरी डासांच्या अळ्या आणि विषाणूंसाठी हे पाणी आणि जलपर्णी वरदान ठरत आहे. सरोवरात येणाऱ्या ड्रेनेजच्या पाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणाच बंद असल्यामुळे या घाणेरड्या पाण्यात नायट्रोजन, फॉस्फरस अशी पोषकद्रव्ये ठासून भरलेली आहेत. 

या "पौष्टिक' पाण्यावर पांघरूण घातलेल्या जलपर्णीच्या खाली फोफावलेल्या वनस्पती आणि शेवाळलेल्या पाण्यात डासांच्या अळ्यांना भरपूर खाद्य तर मिळतेच, शिवाय सूर्यप्रकाशापासून सुरक्षित निवाराही लाभला आहे. त्यातच सिडको, हडको, हिमायतबाग, रोजाबाग, गणेश कॉलनी परिसरातील नागरिकांच्या आजारपणाचे मूळ दडलेले आहे. डेंगीच्या रुग्णांची संख्या भरपूर आहे, असे परिसरातील डॉक्‍टर संतोष आव्हाळे यांनी सांगितले. त्यामुळे न्यायालयात प्रलंबित याचिकेवर निर्णय होऊन परिसर स्वच्छ व्हावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. 

मुडदा फेकला तरी कळणार नाही 
तलावाच्या परिसरात नाक दाबून फिरावे लागते. आठ कोटी खर्चून उभारलेला प्रक्रिया प्रकल्प बंद आहे. कुणी खून करून मुडदा फेकला, तरीही कळणार नाही इतकी दाट जलपर्णी आणि बेशरमाची झाडे फैलावली आहेत. आम्हा नागरिकांना आता न्यायालयानेच दिलासा द्यावा, असे येथे मॉर्निंग वॉकला आलेले नागरिक डॉ. वैभव पटाईत म्हणाले. 

स्वच्छतेचे मिळावेत आदेश 
"सलीम अली सरोवर संवर्धन समिती'च्या याचिकेवर उच्च न्यायालयाने या ठिकाणी कुठलेही विकासकाम करण्यावर स्थगिती आणि प्रवेशबंदी घातली. येथील जैवविविधता जपण्यासाठी विशेष काळजी घेण्यासाठी वर्ष 2015मध्ये "रॅपिड ऍक्‍शन रिपोर्ट'ही बनविण्यात आला; मात्र तोवर तलावाचे करायचे काय, याबद्दल स्पष्टता नसल्यामुळे किमान स्वच्छताही राखणे बंद झाले आहे. 

"मान्सोनिया'ची भीती 
जलपर्णीच्या दाटीतही तग धरणारी "मान्सोनिया' ही डासांची नवी प्रजाती जन्माला आली आहे. पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी "सकाळ'मध्येच एका लेखातून याबद्दल माहिती दिली. ही डासांची रक्तपिपासू जात हत्तीरोगासारखे आजार पसरवते. हिवताप, डेंगी फैलावणारे डास आपल्याकडे मुबलक आहेत; पण ही जात या सरोवरात असेल, तर मोठ्या आजारांची शक्‍यता नाकारता येत नाही. 
 

Web Title: ncrease in the production mosquitoes due to waterborne discharge