उमरग्याजवळ आठ लाखांचे स्पिरिट जप्त

अविनाश काळे
बुधवार, 13 जून 2018

उमरगा : बेकायदेशीररित्या स्पिरिटची वाहतूक करणाऱ्या टँकरवर छापा टाकून आठ लाख रुपयांचे १६ हजार बल्क लिटर स्पिरिट मुंबईच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जप्त केले. आज (ता. १३) पहाटे दीडच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील जकेकूर चौरस्ता (ता. उमरगा) येथे पथकाने ही कारवाई केली. 

उमरगा : बेकायदेशीररित्या स्पिरिटची वाहतूक करणाऱ्या टँकरवर छापा टाकून आठ लाख रुपयांचे १६ हजार बल्क लिटर स्पिरिट मुंबईच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जप्त केले. आज (ता. १३) पहाटे दीडच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील जकेकूर चौरस्ता (ता. उमरगा) येथे पथकाने ही कारवाई केली. 
मुंबईहून तामिळनाडू राज्यात बेकायदेशीररित्या स्पिरिट घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त अश्विनी जोशी यांच्या निर्देशानुसार व संचालक (अंमलबजावणी व दक्षता विभाग) सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक प्रसाद सास्तुरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास जकेकूर चौरस्ता येथे स्पिरिटची वाहतूक करणारे टँकर (टीएन ४१ एसी- ८८७९) पकडले.

टँकरची तपासणी केली असता त्यात असलेल्या कप्प्यात स्पिरिट असल्याचे ओळखू येऊ नये म्हणून कप्प्याला रंगरंगोटी करण्यात आली होती व मधल्या कप्प्यात ऑईल असलेले पाईप होते. भरारी पथकाने पहाटेपर्यंत कसून तपासणी केली असता टँकरमध्ये १६ हजार बल्क लिटर स्पिरिट असल्याचे आढळून आले. भरारी पथकाने आठ लाख रुपयांचे स्पिरिट, टँकर मिळून १८ लाख ५९ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी विनोदकुमार बाबू (रा. २७, अंगमन कोविल स्ट्रीट रोडहिल्स चेन्नई), नंदकुमार नारायण (रा. ७२, पेलियार कोविल स्ट्रीट रोडहिल्स चेन्नई) या दोघांना अटक केली आहे. 

आरोपींना दुपारी न्यायालयात हजर केले असता शुक्रवारपर्यंत (ता. १५) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. भरारी पथकाचे निरीक्षक प्रसाद सास्तुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक योगेश फटांगरे यांनी ही कारवाई केली. जवान सुधीर माने, गौतम खंडागळे, बाळकृष्ण दळवी यांच्यासह उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा या पथकात समावेश होता.

Web Title: near Umaraga seized 8 lakhs of spirit