घाटी रुग्णालयात चिमुकल्यावरील जोखमीची न्युरोसर्जरी यशस्वी

योगेश पायघन
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

चार महिन्याच्या चिमुकल्याच्या मेंदूतील पाणी काढण्याची जोखमीची शस्त्रक्रीया घाटीत रुग्णालयात शनिवारी (ता.10) यशस्वी करण्यात आली. अशा पद्धतीच्या शस्त्रक्रीया घाटी रुग्णालयात नियमित व्हायला लागल्याने रुग्णांना सुविधा उपलब्ध झाली आहे.

औरंगाबाद ः चार महिन्याच्या चिमुकल्याच्या मेंदूतील पाणी काढण्याची जोखमीची शस्त्रक्रीया घाटीत रुग्णालयात शनिवारी (ता.10) यशस्वी करण्यात आली. अशा पद्धतीच्या शस्त्रक्रीया घाटी रुग्णालयात नियमित व्हायला लागल्याने रुग्णांना सुविधा उपलब्ध झाली आहे. घाटीत नव्याने सुरु होणाऱ्या सुपरस्पेशालीटी विंगमध्ये स्वतंत्र न्यूरोसर्जरी विभाग आहे. त्याची पूर्वतयारी आधीच जनरल सर्जरी विभागाने सुरु केली आहे. 

सावकारवाडी (ता. मालेगाव, जि. नाशिक) येथील मोहिनी जालिंदर मोरे यांचा चार महिन्यांचा मुलगा शंतनुचे डोके काहीसे मोठे दिसायला सुरुवात झाली होती. त्यामुळे तो सतत आजारी राहु लागला होता. त्यांनी मालेगाव येथील डॉक्‍टरांना दाखवले. त्यांनी धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयात रेफर केले. धुळ्यातून त्या चिमुकल्याला घाटीत पाठविण्यात आले. घाटीत आल्यावर डॉ. सरोजिनी जाधव यांनी रुग्णाच्या मेंदुच्या बाजुमध्ये पाणी झाल्याचे निदान करत त्यासाठी शस्त्रक्रीयेची गरजेचे असल्याचे सांगितले, अशी माहीती मोहिनी मोरे यांनी दिली. 

पालकांनी होकार दिल्यानंतर शनिवारी न्यूरोसर्जरी यशस्वी करण्यात आली. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, डॉ. कैलास झिने, डॉ. सरोजिनी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूरोसर्जन डॉ. कपील मुळे, डॉ. तुषार चौधरी, डॉ. आमेर आदींनी ही शस्त्रक्रीया केली. तर भुलतज्ज्ञ डॉ. प्रशांत पाचुरे, ओटी इनचार्ज नाथा चव्हाण, सुनिता पाटील, रंजना पाटील, मेघना गावित यांच्या टीमने सहकार्य केले. आई मोहीनीसह शिवनंदा पाऊलबुद्धे, मुस्कान शेख, शरद क्षीरसागर, श्‍वेता मुनी, वंदना ठाकूर, कल्पना चव्हाण, कांचन हिंगडे, डॉ. ऋषीकेश बनाळे आदी सुश्रूषा करीत आहेत. 

सर्जीकल इमारतीतील ऑपरेशन थिएटर क्रमांक तीनचे काम सुरु असल्याने आता सीव्हीटीएसमधील ओटीत आठवड्यातून दोन दिवस न्यूरोसर्जरी केल्या जाणार आहेत. शनिवारी ओटीत मेंदुची पहिली शस्त्रक्रिया करण्यात आली. जनरल सर्जरी विभागात डोक्‍याला मार लागलेल्या अपघाताच्या रुग्णांसह इतर मेंदुच्या सर्जरी नियमित होत आहेत.'' 
-डॉ. सरोजनी जाधव, सर्जरी विभागप्रमुख, घाटी. 

वय कमी असल्याने जोखीम जास्त होती. जोखीम स्वीकारुन शनिवारी "व्ही. पी. शंट' नावाची शस्त्रक्रीया यशस्वी झाली आहे. आता फिडींग सुरु झाले असून सध्या त्याची तब्बेत स्टेबल आहे. अशा शस्त्रक्रीया घाटीत नियमीत व्हायला सुरुवात झाली आहे. सध्या सिव्हीटीएसमध्ये आठवड्यातून शुक्रवार, शनिवारी या शस्त्रक्रीया होतील. सुपरस्पेशालीटी विंग सुरु झाल्यावर तिथे अशा शस्त्रक्रीया होतील. 
-डॉ. कपील मुळे, सहयोगी प्राध्यापक, न्युरोसर्जरी, घाटी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: neurosurgery successful at ghati Hospital