श्रावण सोमवारमुळे मंगळवारी देणार कुर्बानी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

वाशी (जि. उस्मानाबाद) ः गेल्या अनेक वर्षांपासून शहराची सामाजिक सलोखा जपणारे शहर म्हणून ओळख आहे. याची प्रचिती पुन्हा एकदा आली असून, यावर्षी बकरी ईद व दुसरा श्रावण सोमवार एकाच दिवशी आल्याने येथील मुस्लिम समाजबांधवांनी बकरी ईदनिमित्त देण्यात येणारी बोकडाची कुर्बानी सोमवारऐवजी मंगळवारी देऊन बकरी ईद साजरी करण्याचा निर्णय घेत सामाजिक सलोखा जपला आहे. मुस्लिम समाजबांधवांनी घेतलेल्या या निर्णयाचे तालुक्‍यातील नागरिकांमधून स्वागत होत आहे. 

बकरी ईद सणानिमित्त पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक पोलिस ठाण्यामध्ये घेण्यात आली. या वेळी मुस्लिम समाजातील नागरिकांनी श्रावणी सोमवारच्या दिवशीच बकरी ईदचा सण असल्याने यानिमित्त देण्यात येणारी कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी केवळ नमाज पठण करण्यात येणार असून, बकरी ईदच्या निमित्ताने देण्यात येणारी कुर्बानी मंगळवारी देण्यात येणार आहे. सोमवारी (ता. 12) पवित्र श्रावण महिन्यातील दुसरा श्रावणी सोमवार असून, याच दिवशी बकरी ईद हा सण आहे. 

बकरी ईदच्या दिवशी नमाजनंतर मुस्लिम समाजातील नागरिकांकडून बोकडाची कुर्बानी देण्यात येते. मात्र, हिंदू समाजातिल नागरिकांचा पवित्र श्रावण महिन्यातील दुसऱ्या श्रावण सोमवारीच बकरी ईद आली.

हिंदू समाजातील नागरिकांच्या भावना ओळखून मुस्लिम समाजबांधवांनी सोमवारी बोकडाची कुर्बानी न देण्याचा निर्णय घेत सामाजिक एकोपा जपण्याचे काम केले आहे. बैठकीस पोलिस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष हारूण काझी, बबन पटवेकर, ख्वाजापाशा कुरेशी, अखिल कुरेशी, मुजिब बागवान, आझाद मुजावर, रियाज पठाण, रहेमत नाईकवाडी, शाहबाज काझी यांच्यासह शहरातील मुस्लिम समाजबांधव, पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New about Bakri Eid