बीडमध्ये नवजात बालकाची अदलाबदल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

बीड - स्त्रीभ्रूण हत्येच्या घटनांनी बदनाम बीडमध्ये आता चक्क नवजात बालकांच्या अदलाबदलीचा प्रकार समोर आला आहे.

बीड - स्त्रीभ्रूण हत्येच्या घटनांनी बदनाम बीडमध्ये आता चक्क नवजात बालकांच्या अदलाबदलीचा प्रकार समोर आला आहे.

छाया राजू थिटे (वय 21, रा. भंडारी, ता. सेनगाव, जि. हिंगोली, ह. मु. उपळी, ता. वडवणी) या मजूर महिलेने जिल्हा रुग्णालयात 11 मे रोजी एका मुलाला जन्म दिला होता. मात्र, बाळाचे वजन केवळ एक किलो भरल्यामुळे त्यास काचेच्या पेटीत ठेवण्यात आले. नंतर अधिक उपचारासाठी त्याला डॉ. अभिजित थेटे यांच्या रुग्णालयात दाखल केले. तेथून त्याला डॉ. सचिन जेथलिया यांच्या श्री बाल रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्याला इन्क्‍युबेटरवर ठेवले. डॉ. जेथलिया यांच्याकडे या बाळाची नोंद मुलगी अशी आहे.

दहा दिवस बाळ काचेच्या पेटीत होते, त्याच्या प्रकृतीत सुधारणा जाणवल्याने रविवारी (ता. 20) रात्री त्याला काचेच्या पेटीतून बाहेर काढून आईकडे देण्यात आले. या वेळी हे बाळ मुलगा नसून, मुलगी असल्याचे छाया थिटे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी पती राजू थिटे व नातेवाइकांना याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी शहर पोलिसांत धाव घेतली.

दरम्यान, जिल्हा रुग्णालयात प्रसूतीनंतर जन्मलेल्या प्रत्येक बाळाच्या पायाचे ठसे घेतले जातात. श्री बाल रुग्णालयातही ठसे घेतल्यानंतर उपचार करण्यात आले. ते दोन्ही ठसे तपासणीसाठी तज्ज्ञांकडे पाठविण्यात येणार आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सय्यद सुलेमान यांनी दिली.

बाळ बदलले की नोंद करताना चूक झाली? या निष्कर्षापर्यंत आताच पोहोचता येणार नाही. शिशू विभाग व प्रसूती विभागातील सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल. चौकशीनंतरच यावर भाष्य करणे उचित राहील.
- डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: new born baby Interchange crime