दोन लाखांना गंडा घालून विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी नववधूचे पलायन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

पालखेड - मुलीच्या वडिलांचा अपघात झाला असून उपचारासाठी पैशाची गरज असल्याचे सांगून विवाहेच्छुक तरुणाच्या कुटुंबीयांकडून मुलीच्या बनावट नातेवाइकांनी दोन लाख रुपये घेतले, शिऊर येथील एका मंदिरात लग्नही लावण्यात आले. मात्र, लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नववधू पळून गेल्याने फसवणूक झाल्याचा प्रकार मागील आठवड्यात पोखरी (ता. वैजापूर) येथे घडला. 

पालखेड - मुलीच्या वडिलांचा अपघात झाला असून उपचारासाठी पैशाची गरज असल्याचे सांगून विवाहेच्छुक तरुणाच्या कुटुंबीयांकडून मुलीच्या बनावट नातेवाइकांनी दोन लाख रुपये घेतले, शिऊर येथील एका मंदिरात लग्नही लावण्यात आले. मात्र, लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नववधू पळून गेल्याने फसवणूक झाल्याचा प्रकार मागील आठवड्यात पोखरी (ता. वैजापूर) येथे घडला. 

विवाहासाठी मुली मिळत नसल्याने लग्नाच्या बोहल्यावर चढण्यासाठी उत्सुक असलेल्या मुलांना गंडवणारी जालना जिल्ह्यातील एक टोळी सध्या औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सक्रिय झाली आहे. वैजापूर तालुक्‍यातील पोखरी येथील एका तरुणासोबत हा प्रकार घडल्यानंतर फसवणूक करणारी टोळी सक्रीय असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात एका दलालाला पकडण्यात आले असून त्याने वीस हजार रुपये घेतल्याची कबुलीही दिली आहे. पोलिसांनी या टोळीच्या मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू केला आहे.

सुरेश (काल्पनिक नाव) या तरुणाचे काही दिवसांपूर्वी शिऊर येथील एका मंदिरात विवाह झाला. मात्र, दोन लाख रुपये मुलीकडच्या मंडळींनी घेतल्यानंतर विवाह करून सासरी आलेली नववधू दुसऱ्याच दिवशी पळून गेली. नववधू पळून गेल्याने समाजात बदनामी होण्याच्या भीतीने याची जाहीर वाच्यताही केली जात नाही. त्यामुळेच या संदर्भातील तक्रारी पोलिस ठाण्यापर्यंत पोचत नाहीत. 

बनावट टोळ्या सक्रिय
विवाहासाठी मुली असल्याचे सांगून फसवणूक करणाऱ्या या टोळ्या ग्रामीण भागात सक्रिय झाल्या असून विवाहेच्छुक तरुण व त्यांच्या कुटुंबाला गाठून शहरातील एखाद्या लॉजवर मुलगी दाखविण्याचा कार्यक्रम पार पाडला जातो. मुलगी पसंत पडल्यानंतर तिचे बनावट पालक म्हणून उभे करण्यात आलेल्या दांपत्याला किती रक्कम द्यावी लागणार, याची माहिती संबंधित दलाल देतो. बऱ्याच वेळा ही रक्कम लाखाच्या घरात असते. त्यापैकी ६० ते ७० हजार रुपये दलाल घेतो आणि उर्वरित रक्कम बनावट पालक म्हणून उपस्थित असणाऱ्याला दिली जाते. मागील वर्षी अशाच एका टोळीविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. यात पालखेड येथील दोन युवकांना चार लाख रुपयांना या टोळ्यांनी गंडा घातला होता.

Web Title: new married bride loot crime