नवा विद्यापीठ कायदा विद्यार्थिकेंद्रित - डॉ. धनराज माने

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

औरंगाबाद - उच्च शिक्षणातील बदलांचा वेध घेत नवीन विद्यापीठ कायदा अस्तित्वात आला आहे. विद्यार्थिकेंद्रित असणाऱ्या या कायद्यात सामाजिक आरक्षण, गुणवत्ता व शासनाचे नियंत्रण या तिन्ही बाबींची योग्य सांगड घातली आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी केले.

औरंगाबाद - उच्च शिक्षणातील बदलांचा वेध घेत नवीन विद्यापीठ कायदा अस्तित्वात आला आहे. विद्यार्थिकेंद्रित असणाऱ्या या कायद्यात सामाजिक आरक्षण, गुणवत्ता व शासनाचे नियंत्रण या तिन्ही बाबींची योग्य सांगड घातली आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी केले.

"महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016' विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात बुधवारी (ता. पाच) डॉ. माने बोलत होते. "इंटरनल क्वालिटी ऍशुरन्स सेल' व राज्य शासनाचा उच्च शिक्षण विभागातर्फे एकदिवशीय कार्यशाळा झाली. माजी कुलगुरू तथा अधिनियम समितीचे अध्यक्ष प्रा. एस. आर. माळी यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे होते. यावेळी प्रा. शेखर चंद्रात्रे, प्रा. ए. पी. कुलकर्णी, सहसंचालक डॉ. राजेंद्र धामन्सकर, आनंद म्हापुसकर, प्राचार्य डॉ. जोगेंदरसिंग बिसेन, डॉ. राजेश पांडे, प्रभारी अधिकारी डॉ. सतीश पाटील, कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे, आयक्वाकचे सल्लागार डॉ. एम. डी. जहागीरदार, संयोजक डॉ. सचिन देशमुख उपस्थित होते.

डॉ. माने म्हणाले, 'नवीन विद्यापीठ कायदा हा "चेक्‍स ऍण्ड बॅलन्सेस'चे उत्तम उदाहरण आहे. विविध अधिकार मंडळात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवितानाच सामाजिक आरक्षणचे प्रमाण राखले आहे. विविध अधिकार मंडळे व सदस्य यांची संख्या वाढली आहे. अधिसभेवर पदसिद्ध-नियुक्त व निवडणुकीद्वारे येणारे असे जवळपास सारखेच प्रमाण असणार आहे. दिवसभरातील विविध सत्रांत कायदा, त्यातील प्रत्येक कलम याचे बारकाईने विश्‍लेषण डॉ. माने यांनी केले.

डॉ. माळी यांनी नवीन कायद्याचे विश्‍लेषण केले. डॉ. कुलकर्णी यांनी "विविध अभ्यासमंडळे, अधिकारी यांच्या नेमणुका' विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. शेखर चंद्रात्रे यांनी नवीन तरतुदी सांगितल्या. उच्च शिक्षणाचे धोरण याविषयी आनंद मापुसकर यावर भूमिका मांडली.

संशोधनाला चालना मिळेल - कुलगुरू
देशाची ओळख ही विद्यापीठे, संशोधक, प्राध्यापकांमुळे होत असते. नवीन विद्यापीठ कायदा काळसापेक्ष असून, संशोधन व नवोन्मेष या दोन्ही बाबींना मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केले. विद्या परिषद व व्यवस्थापन परिषदेत विद्यार्थी प्रतिनिधी येणार असल्यामुळे अभ्यासक्रम हा परिवर्तनशील राहील. आपल्या विद्यापीठ कार्यक्षेत्रात नवीन कायद्यातील सर्व तरतुदीचे तंतोतंत पालन करू, असेही कुलगुरू म्हणाले.

Web Title: new university law student focus